Indapur News : इंदापूरमध्ये मंत्री भरणे – माजी मंत्री पाटील आमने-सामने; कर्मयोगी साखर कारखान्याची निवडणूक जाहीर

इंदापूर : पोलीसनामा ऑनलाईन – इंदापूर तालुक्यातील कर्मयोगी शंकरराव पाटील सहकारी साखर कारखान्याचा पंचवार्षीक निवडणुक कार्यक्रम जाहीर झाला आहे. आज मंगळवार (दि. 23) पासून अर्ज भरण्यास सुरुवात झाली आहे. 1 मार्च अर्ज दाखल करण्याची अंतिम मुदत आहे.  येत्या 27 मार्चला 21 संचालकांच्या जागासाठी प्रत्यक्ष मतदान होणार आहे. त्यामुळे इंदापूरमध्ये ग्रामपंचायत निवडणुकीनंतर पुन्हा भरणे – पाटील आमनेसामने येणार आहेत.

आजपासून अर्ज दाखल करण्यास सुरुवात झाली असून 1 मार्चपर्यंत अर्ज दाखल करता येणार आहे. 2 मार्च रोजी अर्जांची छाणनी होणार आहे. 17 मार्चपर्यंत उमेदवारी अर्ज मागे घेता येणार आहेत. इंदापुर, कालठाण, पळसदेव, भिगवण, शेळगाव आदी पाच गटातून प्रत्येकी 3 संचालक व भटक्या जमाती प्रवर्ग 1, मागास प्रवर्ग 1, अनुसुचित जमाती 1, महिला 2 ब वर्ग 1 असे 21  संचालक मंडळासाठी निवडणुक होत आहे.

कारखान्याच्या स्थापनेपासून संस्थापक स्व. शंकरराव पाटील घराण्याकडे निर्विवाद सत्ता आहे. विद्यमान अध्यक्ष माजी मंत्री हर्षवर्धन पाटील यांच्याकडे कारखान्याचे नेतृत्व आहे. राष्ट्रवादीच्या काँग्रेसच्या माध्यमातून सत्तांतरासाठी नेहमी प्रयत्न झाला. मात्र हर्षवर्धन पाटील यांनी एकहाती सत्ता कायम ठेवली. मात्र आता या निवडणुकीत राज्यमंत्री दत्तात्रेय भरणे राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष प्रदीप गारटकर यांची भूमिका महत्वाची आहे.