आ. रोहित पवारांचे दमबाजीचे आरोप फेटाळताना माजी मंत्र्यांनी केला गौप्यस्फोट, म्हणाले…

अहमदनगर : पोलीसनामा ऑनलाईन – ग्रामपंचायत निवडणुका (gram panchayat election 2021)  बिनविरोध करण्यासाठी कर्जत-जामखेडचे आमदार रोहित पवार(Rohit Pawar) यांनी ३० लाख रुपयांचा निधी जाहीर केला. त्यावर टीका करताना माजी मंत्री प्रा. राम शिंदे (ram shinde) यांनी हे प्रलोभन असून गुन्हा दाखल करण्याची मागणी केली होती. त्यानंतर बोलताना पवार यांनी कार्यकर्त्यांना होणारी दमबाजी खपवून घेणार नाही. आपणही सामाजिक गुंड आहोत, असे उत्तर दिले होते. एकमेकांची नावे न घेता आरोपप्रात्यारोपांच्या फैरी या दोघांमध्ये सध्या झडत आहेत. तोच धागा पकडून शिंदे यांनी पुन्हा रोहित पवारांवर निशाणा साधला आहे. कर्जतच्या जोगेश्वरवाडी येथे एका कार्यक्रमात बोलताना राम शिंदे (ram shinde) यांनी ‘गेल्या दहा वर्षांत मी कधीही कोणाला दमदाटी केलेली नाही. उलट मी गृहराज्यमंत्री होतो तेव्हा लोकच मला कामासाठी दमदाटी करायचे. त्यामुळे मी आता कोणाला दमदाटी करण्याचा प्रश्नच नाही,’ असे सांगत रोहित पवार यांना टोला लगावला आहे.

राम शिंदे म्हणाले, सत्तर वर्षांत आपल्या लोकांना काही मिळाले नाही. त्यामुळे आपली कामे करून घेण्यासाठी लोक भांडले तर यात मला काहीच गैर वाटत नाही. राजकारणात हार-जीत असतेच. पदापेक्षा सर्वसामान्यांना मी महत्त्व देतो. ‘नवे पर्व आणि विसरा सर्व’ अशी परिस्थिती सध्या या मतदारसंघात आहे. आपल्या काळात सुरू करण्यात आलेली अनेक कामे ठप्पे झाली आहेत. जेव्हा निवडून गेलो तेव्हा एकच ठरविले की खोटे बोलायचे नाही. जे आहे, जे होणार आहे तेच सांगायचे. समजा एखादा शब्द बोललोच आणि ते काम होण्यात अडचण येत असेल तर काहीही झाले तरी ते करून दाखवाचेच, अशी आपली भूमिका होती. काम झाले नाही तर तक्रार ऐकायला लोकप्रतिनिधी उपलब्ध असले पाहिजेत. मात्र, या बाबतीत गेल्या दीड वर्षात या मतदारसंघाची परिस्थिती खूपच बदलली आहे,’ असेही शिंदे म्हणाले.

दरम्यान, सध्या सुरू असलेल्या ग्रामपंचायतींच्या निवडणुका आणि त्यानंतर येणारी जामखेड नगरपालिका व कर्जत नगरपंचायतीची निवडणूक यामुळे या दोन नेत्यांमधील राजकीय संघर्ष वाढत जाण्याची शक्यता निर्माण झाली आहे.