मजुरांअभावी शेतमाल शेतात पडून ! भाजीपाल्याचे दर चढेच, सामन्यांचा कापला जातोय खिसा

पुणे : प्रतिनिधी – कोरोना व्हायरसचा संसर्ग रोखण्यासाठी 40 व्या दिवशीही देश लॉकडाऊन आहे. शेतमाल काढण्यासाठी मजूर मिळत नसल्याने अनेक शेतकऱ्यांनी शेतातच पडून दिला आहे. तर दुसरीकडे भाजीपाला, फळांची आवक घटल्याने भाव गगनाला भिडले असल्याने सामान्यांच्या खिशाला कात्री लागल्याचे दिसत आहे. आता प्रगती नव्हे, तर जगण्याची धडपड सुरू झाली आहे.

कोरोना व्हायरसचा सर्वच क्षेत्राबरोबर शेतीतील आर्थिक व्यवहारावर मोठा परिणाम होत आहे. शेतामध्ये भाजीपाला, फुले, फळे, काढायला आली आहेत. मात्र मजूर मिळत नसल्याने शेतकऱ्यांचे आर्थिक नुकसान होत आहे. दुसरीकडे, शहरांमध्ये पुरेसा शेतमालाचा पुरेसा पुरवठा होत असला, तरी भाजीपाला, फळ, धान्य यांचे दर मात्र वाढलेले असल्याने ग्राहकांचा खिसा खाली होतान दिसत आहे. दुसरीकडे कंपन्या, उद्योग, व्यवसाय बंद असल्याने मासिक उत्पन्नही बंद झाल्याने नोकरदार वर्ग चिंताग्रस्त झाला आहे.

शेतामध्ये वेगवेगळ्या प्रकारचा भाजीपाला, फुले, फळे, तयार झाली आहेत. त्याची तोडणी- वेचणी करण्यासाठी मजूर मिळत नाहीत. मजुरांना शेतामध्ये कामाला नेण्यासाठी नाकीनऊ येत आहे. उपलब्ध शेतमजुरांसह शेतकरी सहकुटुंब शेतमाल काढून ठेवत असले, तरी खरेदीसाठी त्यांच्या अपेक्षांवर पाणी फिरवत आहेत. शेतमाल जितक्या प्रमाणात काढला जातो, त्याहून कमी प्रमाणात खरेदी केली जाते. दरसुद्धा पाडून मागितला जात आहे.

संघर्ष फक्त जगण्यासाठी

शहर असो वा खेडे असो आता संघर्ष फक्त जगण्याचा सुरू झाला आहे. फायदा-तोटा गौण मानला जात आहे. कोरोनामुळे सर्व व्यवहार ठप्प आहेत, त्यामुळे आता शेतीचे उत्पन्न सुरू आहे. त्यालाही मजूर मिळत नाही. ग्रामीण भागातून शहरापर्यंत जाताना अनेक यातना सहन कराव्या लागत आहेत. शहरात गेल्यानंतर कोरोना व्हायरसची भीती, विक्रीसाठी निश्चित ठिकाणे नाहीत, त्यामुळे शेतकऱ्यांचीही सर्वच बाजूने कोंडी होत असून, कोरोनाने फक्त जगण्याची लढाई समोर ठेवली आहे.

शेतमालाची कवडीमोलाने विक्री

केळी उत्पादक शेतकरी म्हणाले की, यंदा १८ टन केळी उत्पादन अपेक्षित आहे. त्यातील चार टन केळीची विक्री झाली आहे. बाकीची केळी पक्व होत आहेत. तीन आठवडय़ापूर्वी प्रतिटन दहा ते अकरा हजार रुपये असा दर मिळत होता. आता मात्र पाच हजार रुपये मिळणे मुश्कील झाले आहे. केळी जनावरांना खायला घालण्यावाचून पर्याय राहिला नाही.

कलिंगडाची उत्पादक शेतकऱ्याचासुद्धा असाच अनुभव आहे. ‘दहा हजार रुपये टन प्रमाणे महिन्यापूर्वी विकले जाणारे कलिंगड आता निम्म्या किमतीलाही घेण्यासाठी कोणी येत नाही. यामुळे जिल्हा कृषी विभागाकडून परवाना घेऊन गावोगावी पन्नास-साठ रुपये दराने कलिंगडच किरकोळ विक्री सुरू केली आहे. बऱ्याच गावांमध्ये विक्रीसाठी येण्यास मज्जाव केला जात आहे, असे त्यांनी सांगितले.

दरम्यान, दोन एकरामध्ये एका कुटुंबाने ३० टन ढबू मिरची गावकऱ्यांना मोफत देऊन टाकली, तर अनेक गावांमध्ये टोमॅटो विकला जात नसल्याने शेतातच फेकला जात आहे. शेतकऱ्यांवर कोरोनाबरोबर आर्थिक संकट कोसळले आहे. बियाणाचासुद्धा खर्च निघत नही.

ग्राहकाच्या खिशाला कात्री

शहरातील चित्र मात्र भलतेच आहे. पुरेशा प्रमाणात शेतमाल पुरवठा होत आहे. तरीसुद्धा दर २५ ते ३० टक्के वाढले आहेत. बाजारातील या व्यवहारात थेट शेतात जाऊन घाऊक खरेदी करणारे, दलालांचे फावत असल्याने त्यांच्यावर कारवाई करण्याची मागणी ग्राहकांकडून होत आहे.

प्रशासनाचा दक्षतेचा दावा

‘अन्नधान्य, भाजीपाला याचा तुटवडा नाही. बाजार समितीतील याबाबतची आकडेवारी पाहिली तर ग्राहकांना पुरेसा पुरवठा आहे. शेतकऱ्यांना वाहतुकीची अडचण येऊ नये, यासाठी तत्काळ परवाने दिले जात आहेत. शेतकरी, शेतकरी मंडळ यांच्या वतीने शिवार ते बाजार अशी विक्री करणाऱ्यांनाही परवाने दिले आहेत. ग्राहक व शेतकरी यांच्यात दराचा निर्णय ठरत असतो. त्यामध्ये थेट हस्तक्षेप होत नाही. कृषी विभागाकडून कोणत्याही प्रकारची अडचण शेतकऱ्यांना येणार नाही याची काळजी घेतली जात आहे’ असे सांगितले.