एकेकाळी पाकिस्तानचे हुकूमशहा अन् आज आहे दयनीय अवस्था

पोलीसनामा ऑनलाईनः एकेकाळी पाकिस्तानचे हुकूमशहा असणाऱ्या परवेझ मुशर्रफ यांची प्रकृती ढासळली असून दयनीय अवस्था झाल्याचे फोटो सध्या सोशल मिडियावर व्हायरल होत आहेत. लष्करप्रमुख असताना पाकिस्तानमधील सरकार उलथवून लष्करी राजवट लागू करणारे मुशर्रफ गंभीर आजारी असल्याचे वृत्त असून सोशल मीडियावर त्यांच्या फोटोवर पाकिस्तानातून संमिश्र प्रतिक्रिया उमटत आहेत. ऑल पार्टीज मुस्लिम लीगने मुशर्रफ यांचा फोटो शेअर करून त्यांच्या चांगल्या प्रकृतीसाठी शुभेच्छा दिल्या आहेत. तर पाकिस्तानी युजर्सने त्यांच्यावर टीका केली आहे. मुशर्रफ हे पाकिस्तानचे नायक नाहीत. त्यांनी अमेरिकेला पाकिस्तान विकल्याची टीका युजर्स करत आहेत. त्यांनी केलेल्या कर्माची फळे ते आज भोगत असल्याचेही युजर्सने म्हटले.

 

 

 

 

ऑल पार्टीज मुस्लिम लीगने ट्विट केलेला फोटो डिलीट केला असला तरी सध्याचे पाकिस्तानचे मंत्री चौधरी फवाद हुसैन यांनी मुशर्रफ यांचा फोटो शेअर केला असून त्यांच्या प्रकृतीत सुधारणा व्हावी यासाठी शुभेच्छा दिल्या आहेत. भारत-पाकिस्तानमध्ये 1999 मध्ये शांतता चर्चा सुरू असताना त्यावेळी लष्करप्रमुख असलेल्या मुशर्रफ यांनी कारगिल युद्ध घडवून आणले. त्यानंतर नवाज शरीफ यांचे सरकार उलथवून सत्ता आपल्या ताब्यात घेतली. मुशर्रफ यांनी 2001 ते 2008 दरम्यान पाकिस्तानचे राष्ट्रपती म्हणून कार्यभार पाहिला. मुशर्रफ यांना 2019 मध्ये देशद्रोहाच्या गुन्ह्याखाली मृत्यूदंडाची शिक्षा झाली. मुशर्रफ यांनी आणीबाणी जाहीर केल्याबद्दल वर्ष 2007 मध्ये पाकिस्तान मुस्लिम लीगने देशद्रोहाचा खटला दाखल केला होता. मुशर्रफ 2016 पासून उपचारासाठी दुबईत असून ते अद्यापही पाकिस्तानमध्ये परतले नाहीत. पाकिस्तानमध्ये परतल्यास अटक करण्यात येईल, या भीतीने मुशर्रफ पुन्हा मायदेशी परतले नाहीत.