5 राज्यातील निवडणुकांनी घडविला ‘चमत्कार’; 6 एप्रिलपर्यंत इंधन दरवाढ नाही ?

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – आंतरराष्ट्रीय बाजारातील दरानुसार भारतीय पेट्रोल, डिझेलचे दर निश्चित होतात, त्यात सरकारचा हस्तक्षेप नसतो, असे म्हणत पेट्रोलियम मंत्र्यांसह सर्व सत्तारुढ पक्षाचे नेते काही दिवसांपूर्वी भाववाढीचे समर्थन करीत होते. मात्र, पाच राज्यातील विधानसभेच्या निवडुकांचा कार्यक्रम जाहीर होताच सलग १२ ते १३ दिवस पेट्रोल, डिझेलच्या दरात होत असलेल्या दरवाढीला अचानक ब्रेक लागला आहे. २७ फेब्रुवारीनंतर एखादा दिवसाचा अपवाद वगळता पेट्रोल, डिझेलच्या किंमतीत वाढ झाली नाही. त्याचवेळी याच काळात आंतरराष्ट्रीय क्रुड ऑईलचे दर ६० डॉलरवरुन ६८ डॉलरवर गेले तरी देशातील पेट्रोल, डिझेलच्या दरात कोणतीही वाढ झालेली नाही.

पेट्रोल, डिझेलच्या दरात होणार्‍या भाववाढीमुळे सर्वसामान्यांचे जीवन त्रस्त झाले आहे. विरोधकांनी त्याविरोधात आवाज उठविण्याचा प्रयत्न केला. त्यांना अल्पस्वल्प प्रतिसाद मिळाला असला तरी असे दर वाढत राहिले तर निवडणुकीतील मतदानांवर त्याचा नक्कीच परिणाम होण्याची शक्यता आहे. हे लक्षात घेऊनच केंद्र सरकारच्या सक्त ताकदीमुळेच गेल्या १५ दिवसांमध्ये पेट्रोल, डिझेलच्या किंमतीत दरवाढ होऊ शकली नसल्याचे सांगितले जात आहे.

पश्चिम बंगाल, आसाम आणि पाँडेचरीमध्ये भाजपाला मोठ्या आशा आहेत. जर पेट्रोल, डिझेलच्या किंमतीत अशाची भाववाढ होत राहिली तर पश्चिम बंगाल, आसाममध्ये त्याचा सर्वाधिक परिणाम जाणवेल, या शक्यतेने ही भाववाढ रोखून धरण्यात आली आहे. हे पाहता येत्या ६ एप्रिलपर्यंत देशवासियांना पेट्रोल, डिझेलच्या भाववाढीतून तात्पुरता का होईना दिलासा मिळण्याची शक्यता आहे.