जेव्हा दिल्ली विमानतळावर विमान होते ‘हायजॅक’

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – दिल्लीहून कंधारला जाणारे विमान उड्डाण घेण्याच्या तयारीत होते. अचानक  विमानाचे अपहरण होत असल्याचा संदेश प्रवाशांसह दिल्ली विमानतळावरील सुरक्षा अधिकाऱ्यांना मिळतो. पाठोपाठ एनएसजी कमांडो व इतर सुरक्षा रक्षक धावपट्टीवर उतरतात. संपूर्ण विमानाला वेढा घालतात. इकडे विमानातही प्रवाशांचा गोंधळ उडालेला असतो. सर्व यंत्रणा सर्तक होतात. संपूर्ण विमानाची दोन तास तपासणी होते. विमान उड्डाण घेण्याच्या तयारीत असताना वैमानिकाकडून चुकून हायजॅक बटण म्हणजेच विमानाचे अपहरण होत असल्याची सूचना देणारे बटण दाबले आणि गोंधळ झाल्याचे स्पष्ट होते. तेव्हा कोठे सर्वांचा जीव भांड्यात पडला.
दिल्ली विमानतळाहून अफगाणिस्तानमधील कंदाधारसाठी एफजी ३१२ हे विमान उड्डाण  घेत होते. वैमानिकाने विमान सुरू करताना चुकून विमान हायजॅकचे बटण दाबले. त्यामुळे सर्व सुरक्षा यंत्रणा जाग्या झाल्या. यापूर्वी कंदाधारला पाकिस्तानच्या दहशतवाद्यांनी वाजपेयी यांचे सरकार असताना असेच विमानाचे अपहरण केले होते. या घटनेची आठवण झाल्याने सुरक्षा अधिकाऱ्याचे काही क्षण टेन्शन वाढले होते.

सुरक्षा रक्षकांनी  विमानाची तपासणी केल्यानंतर दी एरियाना अफगाण एअरलाइन्सचे विमान दोन तास उशिराने रवाना झाले. कोणतीही अधिकृत प्रतिक्रिया याबाबत त्वरित उपलब्ध झाली नसली तरी विमानाचे अपहरण होत असल्याची सूचना देणारे बटण दाबण्यात आल्याने राष्ट्रीय सुरक्षा दल (एनएसजी) या दहशतवादविरोधी दलासह सर्व यंत्रणा सज्ज झाल्या होत्या. मात्र अखेर वैमानिकाने चुकून हे बटण दाबल्याचे लक्षात आले.