पिंपरी : सराईत गुन्हेगार 9 महिन्यानंतर गजाआड

पिंपरी : पोलीसनामा ऑनलाईन – नऊ महिन्यांपासून खुनाच्या प्रयत्नाच्या गंभीर गुन्ह्यातील फरार सराईत गुन्हेगाराला खंडणी दरोडा विरोधी पथकाने सापळा रचून अटक केली.

योगेश दिनेश सावंत (२७, रा. वंदे मातरम चौक, रुपीनगर, तळवडे) असे अटक केलेल्या सराईत आरोपीचे नाव आहे. वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुधीर अस्पत यांनी दिलेल्या माहितीनुसार, खंडणी दरोडा विरोधी पथकाचे पोलीस रावेत परिसरात गस्त घालत असताना पोलीस नाईक निशांत काळे यांना माहिती मिळाली की, निगडी पोलीस ठाण्याच्या हद्दीमध्ये खुनाच्या प्रयत्नाच्या गुन्ह्यात फरार असलेला रेकॉर्डवरील आरोपी लंडन ब्रिजजवळ भोंडवे कॉर्नर येथे थांबला आहे.

त्यानुसार पोलीस आयुक्त आर. के. पद्मनाभन, अपर पोलीस आयुक्त रामनाथ पोकळे, पोलीस उपायुक्त सुधीर हिरेमठ, सहाय्यक पोलीस आयुक्त राजाराम पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुधीर अस्पत, पोलीस उपनिरीक्षक विठ्ठल बढे, पोलीस कर्मचारी अजय भोसले, निशांत काळे, किरण काटकर, उमेश पुलगम, सागर शेडगे यांच्या पथकाने सापळा रचून शिताफीने योगेश याला ताब्यात घेतले.

योगेश याच्यावर २०१२ साली मारहाणीचा एक, २०१४ साली गंभीर मारहाण आणि खुनाचा प्रयत्नाचा असे दोन आणि २०१८ साली त्याच्यावर खुनाच्या प्रयत्नाचा असे एकूण चार गुन्हे दाखल असल्याचे निष्पन्न झाले. मागील नऊ महिन्यांपासून तो पोलिसांना गुंगारा देऊन पळत आहे. निगडी पोलीस त्याच्या मागावर होते. अखेर खंडणी दरोडा विरोधी पथकाने त्याला बेड्या ठोकल्या. पुढील कारवाईसाठी त्याला निगडी पोलिसांकडॆ देण्यात आले आहे.

आरोग्यविषयक वृत्त