पिंपरी : आईला रुग्णालयात नेणार्‍या असहाय्य तरुणीचा विनयभंग करणारा अ‍ॅम्बुलन्स चालकाला अटक

पिंपरी : वाय सी एम हॉस्पिटलमधून आदित्य बिर्ला हॉस्पिटलमध्ये आपल्या आईला घेऊन जाणार्‍या असहाय्य तरुणीचा अम्बुलन्स चालकाने विनयभंग केल्याचा प्रकार समोर आला आहे. याप्रकरणी पिंपरी पोलिसांनी किशोर पाटील या अ‍ॅम्बुलन्स चालकाला अटक केली आहे.

याप्रकरणी एका २२ वर्षाच्या तरुणीने पिंपरी पोलिसांकडे फिर्याद दिली आहे. ही घटना २५ एप्रिल रोजी सायंकाळी पाच वाजण्याच्या सुमारास घडली होती. फिर्यादी तरुणीची आई आजारी असल्याने तिला वाय सी एम रुग्णालयात दाखल केले होते. तिला तेथून थेरगाव येथील आदित्य बिर्ला हॉस्पिटलमध्ये दाखल करायचे होते. त्यामुळे पाटील याच्या अ‍ॅम्बुलन्समधून नेण्यात येत होते.

यावेळी पाटील याने आईस अ‍ॅम्बुलन्समधून खाली उतरविल्यास त्यांच्या जीवाचे बरेवाईट होईल, अशी भिती दाखवून फिर्यादी यांच्याकडून पैसे घेतले व त्यांच्याकडून पैसे घेताना वेगळ्या नजरेने पाहून त्यांचा हात धरुन ठेवला. त्यांनी त्याचा हात झटकला असता त्याने फिर्यादीला ‘‘चार आणेची मुलगी बारा आणेका मसाला’’ असे फिर्यादीकडे पाहून त्यांना उद्देशून मनास लज्जा उत्पन्न होईल असे कृत्य केले. आई आजारी असल्याने त्यांनी त्यावेळी घाबरुन तक्रार केली नव्हती. त्यानंतर आता त्यांनी तक्रार दिली असून पोलिसांनी अ‍ॅम्बुलन्स चालकाला अटक केली आहे.