Coronavirus : इंग्लंडहून पिंपरी चिंचवडमध्ये आलेले 7 प्रवासी ‘कोरोना’ पॉझिटिव्ह

पिंपरी/पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – पिंपरी-चिंचवड (Pimpri-Chinchwad) शहरात गेल्या 24 तासात 123 नवीन कोरोना (CoronaVirus) पॉझिटिव्ह रुग्ण आढळून आले आहेत. तर दिवसभरात 84 जणांना रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला असल्याची माहिती पिंपरी चिंचवड महापालिकेच्या वैद्यकिय विभागाने दिली आहे. तर इंग्लंडहून पिंपरी चिंचवड शहरात आलेल्या एकूण प्रवाशांपैकी 7 प्रवाशांचा कोरोना चाचणी अहवाल पॉझिटिव्ह आला आहे.

गेल्या 24 तासात शहरामध्ये 123 कोरोनाचे रुग्ण आढळून आले आहेत. शहरात कोरोना बाधित रुग्णांची संख्या 96 हजार 851 वर पोहचली आहे. आज 84 रुग्णांची दुसऱ्या चाचणीचा अहवाल निगेटिव्ह आल्याने त्यांना रुग्णालयातून घरी सोडण्यात आले आहे. आतापर्यंत 93 हजार 559 रुग्णांनी कोरोनावर मात केली असून त्यांना रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला आहे. शहरात रुग्णांची संख्या घटत असताना मृत्यूचे प्रमाण देखील कमी झाले आहे.

गेल्या 24 तासामध्ये शहरात 4 रुग्णाचा मृत्यू झाला आहे. यामध्ये शहरातील 2 तर हद्दीबाहेरील 2 रुग्णांचा समावेश आहे. आज मृत्यू झालेल्या रुग्णांमध्ये बालाजीनगर, आकुर्डी, खेड, जुन्नर येथील रुग्णांचा समावेश आहे. आतापर्यंत शहरात 2492 रुग्णांचा कोरोनामुळे मृत्यू झाला असून यामध्ये 1759 शहरातील तर 733 पालिका हद्दी बाहेरील आहेत. सध्या पिंपरी चिंचवड शहरामध्ये 647 रुग्ण ॲक्टिव्ह (Active) असून त्यांच्यावर शहरातील कोव्हिड केअर सेंटरमध्ये उपचार सुरु आहेत. पिंपरी महापालीका हद्दीबाहेरील 62 रुग्णांवर शहरातील विविध रुग्णालयात उपचार सुरु आहेत. तर पिंपरी चिंचवडमधील 37 रुग्णांवर पुण्यातील रुग्णालयात उपचार सुरु आहेत.

इंग्लंडवरून आलेले 7 रुग्ण पॉझिटिव्ह
इंग्लंडहून मुंबईत उतरलेल्या पिंपरी चिंचवड शहरातील 268 प्रवाशांचा शोध घेण्यात आला आहे. त्यापैकी 14 प्रवासी भारतात परतलेले नाहीत. 50 प्रवासी बाहेरगावी गेलेले आहेत तर 16 प्रवाशांचा 28 दिवसांचा कालावधी पुर्ण झालेला आहे. उर्वरित 188 प्रवाशांची चाचणी केली असून त्यापैकी 181 जणांचा अहवाल निगेटिव्ह आला आहे. तर 7 जणांचा अहवाल पॉझिटिव्ह आला असल्याची माहिती आरोग्य विभागाने दिली आहे.