Pimpri : चोरीला गेलेला ‘माल’ ऐकून पोलीसही चक्रावले; चोरीचीही हद्द केली

पिंपरी : पोलीसनामा ऑनलाइन –  चोरटे घरात शिरून सोन्या-चांदीचे दागिने, किमती सामान चोरून नेतात. रस्त्यावर पार्क केलेल्या दुचाकी, चारचाकी वाहने चोरून नेतात. निगडी पोलीस ठाण्यात एक जण आले व त्यांनी चोरीची तक्रार करायची असल्याचे सांगितले. काय चोरीला गेल्याचे विचारल्यावर गेलेल्या मालाचे वर्णन ऐकून पोलीसही चक्रावून गेले आहेत. रस्त्याच्या कडेला उभे केलेले फिरते शौचालय ट्रॉली चोरीला गेल्याची त्यांची तक्रार होती.

या प्रकरणी महेश नानासाहेब आढाव (वय ४२, रा. आनंदनगर, जुनी सांगवी) यांनी निगडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

निगडी येथील स्पाईन रोडवर चिकन चौकात रोडच्या कडेला फिरते शौचालय ट्रॉली उभी करण्यात आली होती. ३ व ४ डिसेंबरदरम्यान ही ९५ हजार रुपयांची ट्रॉली कोणीतरी चोरून नेली. पोलिसांनी अज्ञात चोरट्याविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. चोरटे ड्रेनेजची झाकणे, रस्त्यावरील रेलिंगपासून काहीही चोरून नेत असल्याचे यापूर्वी आढळून आले आहे. पण आता चक्क शौचालयाची ट्रॉलीच चोरीला गेली आहे. चोरीचीही आता हद्द झाली.