पिंपरी : 5 लाखाचे कर्ज मिळवून देण्यासाठी चक्क शरीरसुखाची मागणी, दोघांना अटक

पिंपरी : महिलेला ५ लाख रुपयांचे कर्ज मिळवून देतो, असे आमिष दाखवून त्याकरीता शरीरसुखाची मागणी करणार्‍या दोघांना चिचंवड पोलिसांनी अटक केली आहे.

गोविंद किसनराव सावंत (रा. घरकुल, चिखली), गौतम शिरसाठ (रा. किरकिटवाडी, सिंहगड रोड) अशी अटक केलेल्यांची नावे आहेत. सावंत याच्या बहिणीवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याबाबत पोलिसांनी सांगितले की, १९ डिसेंबर २०२० रोजी गोविंद सावंत याने फिर्यादी महिलेला मोबाईलवरुन कर्ज मिळवून देण्याचे आमिष दाखविले. तसेच वेळोवेळी कर्जाच्या नावाखाली व्हॉटसअपवर अश्लिल चॅटिंग केले. त्यांना ५ लाख रुपयांचे कर्ज प्रकरण करुन देतो, असे प्रलोभन दाखवून त्याकरीता शरीर सुखाची मागणी केली.

सावंत, शिरसाठ व सावंत याची बहिण यांनी संगनमत करुन फिर्यादी यांना ५ लाख रुपयाचे कर्ज देण्याचा बहाण्याने त्यांच्याकडून प्रोसेसिंग फी म्हणून ५ हजार ५०० रुपये घेतले. त्यांना कोणतेही कर्ज उपलब्ध करुन दिले नाही. घेतलेल्या प्रोसेसिंग फीपैकी एक हजार रुपये परत केले. उरलेले साडेचार हजार रुपये परत न करता फसवणूक केली. कर्ज मिळाल्यानंतर ३० हजार रुपये कमिशन म्हणून देण्याची त्यांनी मागणी केली होती. सहायक पोलीस निरीक्षक ठुबल अधिक तपास करीत आहेत.