Pimpri : गुंगीचे औषध देऊन प्रेमिकानेच तरुणाला लुटले

पिंपरी : पोलीसनामा ऑनलाइन – कोल्ड ड्रिंक्समध्ये गुंगीचे औषध टाकून तरुणीवर अत्याचार करुन तिचे अश्लिल फोटो, व्हिडिओ काढून धमकाविल्याची प्रकरणे अनेकदा समोर येतात. त्याच्या नेमका उलटा प्रकार रावेतमध्ये झाला आहे. तरुणाच्या घरी जेवणासाठी आलेल्या प्रेमिकेने तरुणाच्या पाण्यात गुंगीचे औषध टाकून त्याला लुबाडल्याचा प्रकार समोर आला आहे.

याप्रकरणी रावेत येथील कृष्णा हाईटसमध्ये राहणार्‍या एका २८ वर्षाच्या तरुणाने देहुरोड पोलिसांकडे फिर्याद दिली आहे. त्यावरुन पोलिसांनी शिखा नलावडे पाटील असे नाव असलेल्या तरुणीवर गुन्हा दाखल केला आहे. हा प्रकार रावेत येथील कृष्णा हाईटसमध्ये १० डिसेंबर रोजी सायंकाळी घडला.

हा तरुण आणि शिखा यांची बबल अ‍ॅप्लीकेशनवरुन ओळख झाली होती. ओळखीनंतर त्याने १० डिसेंबर रोजी तिला भेटायला बोलावले होते. दोघेही शिवाजीनगर येथे भेटले. त्यानंतर ते जेवण करण्यासाठी फिर्यादीच्या घरी गेले. दोघेही जेवण करीत असताना फिर्यादी हा लघुशंकेसाठी गेला असताना या तरुणीने त्यांच्या पाण्याचे ग्लासमध्ये गुंगी आणणारे औषध टाकले. फिर्यादीने हे पाणी पिल्यानंतर त्याला गुंगी आले. तो झोपी गेल्यावर या तरुणीने त्याच्या हातातील दोन अंगठ्या, गळ्यातील सोन्याची चैन व आयफोनचा हेडफोन चोरुन नेला. सहायक पोलीस निरीक्षक विशाल जाधव अधिक तपास करीत आहेत.