Pimpri News : सुमित ग्रुप ऑफ कंपनीतर्फे पोलिसांना रुग्णवाहिका, सायबर सुरक्षा प्रशिक्षणाला सुरुवात; पोलीस आयुक्त कृष्ण प्रकाश म्हणाले – ‘कुछ कदम तुम बढाओ, कुछ हम बढाते’

पिंपरी : पोलीसनामा ऑनलाइन – औद्योगिक क्षेत्राने पोलिसांसोबत एकत्रित काम केले पाहिजे. एक जिद्दीने एक संकल्प करुन काम करणे आवश्यक आहे. सुमित ग्रुपने पोलिसांना सीएसआर अंतर्गत रुग्णवाहिका दिली आहे. बेवारस मृत देहाची विल्हेवाट लावताना रुग्णवाहिकीचे पोलिसांना मोठी मदत होणार आहे. सुमित ग्रुप खासगी कंपनी असूनही पोलिसांसोबत सर्वांसाठी काम करत आहे. या माध्यमातून सुमित कंपनीने नवीन अध्याय जोडला असल्याचे सांगत ‘ कुछ कदम तुम बढाओ, कुछ हम बढाते’ असे आवाहन पोलीस आयुक्त कृष्ण प्रकाश यांनी उद्योग क्षेत्राला केले. सायबर क्राईम झपाट्याने वाढत असून ते हाताळणे महत्वाचे आहे. त्यासाठी सुमित ग्रुपने घेतलेला पुढाकार कौतुकास्पद आहे, असेही ते म्हणाले.

चिंचवड येथील सुमित ग्रुप ऑफ कंपनीतर्फे सीएसआर अंतर्गत पोलिसांना मंगळवारी (दि.9) रुग्णवाहिका देण्यात आली. पोलीस आयुक्त कृष्ण प्रकाश यांच्याकडे रुग्णवाहिकेची चावी सुपुर्द करण्यात आली. डिजिटल टास्क फोर्स आणि सुमीत ग्रुपच्या संयुक्त विद्यमाने सायबर क्राईमचा तपास, सुरक्षा याबाबत चिंचवड येथील कुणाल प्लाझा येथे देण्यात येणा-या प्रशिक्षणाचा शुभारंभही प्रकाश यांच्या हस्ते करण्यात आला. यावेळी सहाय्यक पोलीस आयुक्त सुनील पिंजण, सुमित ग्रुप ऑफ कंपनीचे अध्यक्ष प्रभाकर साळुंखे, युनिक डेल्टा फोर्स सिक्युरीटीचे व्यवस्थापकीय संचालक  ब्रिगडीयर महेश इराणा (निवृत्त), संचालक सुदेश नायर, कायदेतज्ज्ञ नंदू फडके, पिंपरी-चिंचवडचे उपमहापौर केशव घोळवे आदी उपस्थित होते.

आयुक्त कृष्ण प्रकाश म्हणाले, सुमित ग्रुप कंपनीचा मी खूप आभारी आहे. त्यांनी पुढाकार घेऊन पोलिसांना रुग्णवाहिका दिली आहे. बेवारस मृत देहाची विल्हेवाट लावताना पोलिसांना खूप साऱ्या अडचणींना सामोरे जावे लाग होते. सोईसुविधाच्या अभावी अपघातजन्य परिस्थिती हाताळताना आम्ही हतबल होतो. कंपनीतर्फे रुग्णवाहिके सोबत प्रशिक्षित दोन चालक, इंधनाचा खर्चही दिला जाणार आहे. ही सुविधा चोवीस तास सुरू असणार आहे. रुग्णवाहिकेवर पोलिसांचाच संपर्क क्रमांक दिला जाईल. अपघातावेळी रुग्णवाहिकेचा मोठा फायदा होईल.

सायबर कोर्सेसबाबत बोलताना प्रकाश म्हणाले, सायबर क्राइम झपाटयाने वाढत आहे. त्यासाठी सर्वच पातळीवर जागृती निर्माण करणे गरजेचे आहे. सायबर क्राइमच्या केसेस हाताळताना पोलिसांना सायबर क्राइम, फॉरेन्सिक शिकणे गरजेचे आहे. यासाठी यांच्या सारख्या सायबर क्राईम एक्सर्पटची पोलिसाना खूप गरज आहे. सायबर गुन्ह्यांची संख्या दिवसेंदिवस वाढत असताना, त्याबद्दल जागरूकता निर्माण करणे गरजेचे आहे. Cyber Crime, Forensic आणि Cyber Law मध्ये शिक्षण देणा-या डिजिटल टास्क फोर्स संस्थेने यासाठी पुढाकार घेतला आहे. त्यानिमित्त मी डिजिटल टास्क फोर्स आणि सुमित ग्रुपचे मनापासून आभार मानतो. त्यांनी पिंपरी-चिंचवड शहर पोलिसांसाठी हे कोर्सस चालू केले आहेत. पिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्तालयचे डॉ. संजय तुंगार, वरिष्ठ पोलिस निरीक्षक सायबर क्राईम सेल हे या टीमचे पार्ट आहेत.

सुमित ग्रुप ऑफ कंपनीचे अध्यक्ष प्रभाकर साळुंखे म्हणाले, समाजाची उतराई होण्यासाठी वंचित समाजातील नागरिकांसाठी कंपनीतर्फे सीएसआरअंतर्गत रुग्णवाहिका दिली आहे. पोलिसांना अनेक अडचणींना सामना करावा लागतो. पोलिसांना सर्वांनी मदत करण्याची आवश्यकता आहे. आम्ही रुग्णवाहिकेचा उपक्रम घरापासून सुरु केला आहे. एक रुग्णवाहिका पिंपळेगुरव, पिंपळेसौदागर, सांगवी या भागात मोफत फिरत आहे. मागील पाच वर्षांपासून ही रुग्णवाहिका नागरिकांच्या सेवेत आहे.

कायदेतज्ज्ञ नंदू फडके म्हणाले, सायबर क्राईम अतिशय धोकादायक आहे. प्रत्येकजण आपल्या उपजीविकेसाठी काम करत काटकसर करून पुंजी बँकेत ठेवतो. पण, हॅकर एका क्लिकवर पैसे घेवून जातो. सायबर क्राइमचे चोर उच्चशिक्षित असतात. त्यामुळे आपण त्यांच्यापेक्षा हुशार होणे आवश्यक आहे. नागरिकांनी सायबर सुरक्षिततेबाबत जागृत होणे गरजेचे आहे. काळाची गरज ओळखून डिजिटल टास्क फोर्स आणि सुमीत ग्रुप यांनी सायबर क्राईमचा तपास, सुरक्षा याबाबत प्रशिक्षण देण्याचा घेतलेला निर्णय कौतुकास्पद आहे.

कोरोना काळात काम करताना कोरोनाची लागण झाल्याने कंपनीचे कर्मचारी दत्तात्रय पोमण यांचे निधन झाले. त्यांच्या पत्नीला 4 लाख 51 हजार रुपयांचा धनादेश देऊन मदतीचा हात दिला. तसेच कोरोना काळात चोवीस तास काम करणारे एच. पी. सिंग, औंदुबर गोरे यांचा सत्कार करण्यात आला.