पिंपरी : दारु भट्टी उद्धवस्त करण्यासाठी गेलेल्या पोलीस पथकावर दगडफेक

पिंपरी : मुळशी तालुक्यातील नेरे गावात सुरु असलेल्या गावठी दारु भट्टीवर कारवाईसाठी करण्यास गेलेल्या पोलीस पथकावर महिलांनी दगडफेक करीत हल्ला केला. याप्रकरणी हिंजवडी पोलिसांनी तीन महिलांसह ५ जणांवर गुन्हा दाखल केला आहे. याप्रकरणी पोलीस शिपाई रवी प्रकाश पवार यांनी फिर्याद दिली आहे. मुळशी तालुक्यातील नेरे गावातील शिवाजी कॉलनी रोडवर गावठी दारुची भट्टी सुरु असल्याची माहिती हिंजवडी पोलिसांना मिळाली. या ठिकाणी छापा घालण्यासाठी मंगळवारी दुपारी पोलीस तेथे गेले. पोलिसांची चाहुल लागताच दारु काढणारे व तेथे दारु पित बसलेले ४ ते ५ जण गायरानातील गर्द झाडीत पळून गेले.

त्या ठिकाणी दारु तयार करण्याचे रसायनाने पूर्ण भरलेला लोखंडी बॅरल दिसून आला. बाजूला चाटु, अ‍ॅँल्युमिनियमची रुंद परात व दारु गाळण्याचे बॅरल, सरपण इत्यादी साहित्य पडलेले होते. पोलीस ही दारु भट्टी उद्धवस्त करीत असताना अचानक २ -३ महिला तेथे आल्या व त्यांनी पोलिसांवर दगड मारुन हल्ला करण्यास सुरुवात केली. महिला पोलिसांच्या मदतीने या महिलांना पकडण्याचा पोलिसांनी प्रयत्न केला़ परंतु, झाडीचा फायदा घेऊन त्या महिला पळून गेल्या. पोलिसांनी ज्योती अविनाश मारवाडी, रामेश्वरी लुटेरा मारवाडी, अविनाश बरमा मारवाडी, अदित्य मारवाडी, येशु मारवाडी (सर्व रा. शिवाजी कॉलनी रोड, नेरे, ता. मुळशी) यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे़.