Pimpri : सुनेच्या हत्येची सुपारी घेतलेल्यांनी त्यांचाच केला खून; सुपारीचे पैसे परत मागितल्याने केली हत्या

पिंपरी : पोलीसनामा ऑनलाइन – सुनेची हत्या करण्यासाठी व त्यासाठी उत्तर प्रदेशातून पिस्तूल आणण्यासाठी १ लाख ३४ हजार रुपये दिले़ तरीही सुनेची हत्या न केल्याने पैसे परत देण्याचा तगादा लावल्याने तिघांनी सुपारी देणार्‍याचाच खून केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे.याप्रकरणी चाकण पोलिसांनी दोघांना अटक केली आहे.

मोहम्मद वसीम जब्बार (मूळ रा. बालन बाजार, मुंगेर, बिहार) आणि मोहम्मद शहजा द इस्लाम ऊर्फ छोटू (रा. हजरतगंज, खानकाह रोड, मुंगेर, बिहार) अशी अटक केलेल्यांची नावे आहेत. अविनाश बबन राठोड (रा. मोहखेड, ता. जिंतूर, जि़. परभणी) याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

विनायक भिकाजी पानमंद असे खून झाल्याचे नाव आहे. या प्रकरणी सहायक पोलीस निरीक्षक प्रमोद क्षीरसागर यांनी चाकण पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, खेड तालुक्यातील वराळे येथील सुधीर मुंगसे यांच्या नवीन पत्राशेड येथे विनायक पानमंद यांचा मृतदेह आढळून आला होता. शवविच्छेदनात त्यांचा गळा आवळून खून करण्यात आल्याचे स्पष्ट झाले. पोलिसांनी केलेला तपास व मोबाईल लोकेशन यावरून दोघांना ताब्यात घेतले. त्यावरून या खुनाची धक्कादायक माहिती समोर आली.

विनायक पानमंद यांनी त्यांचा मुलगा अजित याची दुसरी पत्नी सीमा हिच्या हत्येचा कट रचला होता. अविनाश राठोडला उत्तर प्रदेशातून पिस्तूल आणण्यासाठी व सीमाच्या हत्येचा मोबदला म्हणून १ लाख ३४ हजार रुपये दिले होते. पैसे घेऊनही राठोड हा सुनेची हत्या करीत नसल्याने त्याने अविनाशकडे पैसे परत कर किंवा सीमाची हत्या कर असा तगदा लावला. त्याच्या तगाद्याने त्रासलेल्या अविनाश राठोड याने जब्बार आणि छोटू याच्या मदतीने कट रचला. पानमंद यांना वराळे येथे बोलावून घेतले. सुधीर मुंगसे यांच्या नवीन पत्राशेड येथे ३० नोव्हेबर रोजी रात्री अकरा वाजता पानमंद आले. तेव्हा जब्बार व छोटू यांनी पानमंद यांचे दोन्ही हात धरले. राठोड याने कापडी बेल्टने पानमंद यांचा गळा आवळला. परंतु, बेल्ट तुटल्याने त्यांनी हाताने त्यांचा गळा आवळून खून केला. पोलीस उपनिरीक्षक दळवी अधिक तपास करीत आहेत.