PK सिनेमात काम करणाऱ्या अभिनेता साई गुंडेवारचं ब्रेन कॅन्सरनं निधन !

पोलिसनामा ऑनलाइन –बॉलिवूड अ‍ॅक्टर साई गुंडेवार याचं निधन झाल्याची माहिती आहे. मिळालेल्या माहितीनुसार, साईचं रविवारी (दि 10 मे) अमेरिकेत निधन झालं आहे. दीर्घकाळापासून तो कॅन्सरसोबत झुंज देत होता.

अशी माहिती समोर आली आहे की, खूप दिवसांपासून साई या खतरनाक ब्रेन कॅन्सरसोबत लढत होता. गेल्या वर्षीपासून लॉस एंजिल्समध्ये त्याच्या या ब्रेन कॅन्सरवर उपचार सुरू होते. त्याच्यामागे त्याची पत्नी आणि आई वडिल आहेत.

एका इंग्रजी वृत्तानुसार, साई गेल्या 7 महिन्यांपासून सोशल मीडियापासून दूर होता. 25 ऑक्टोंबर 2019 म्हणजेच गेल्या वर्षी त्यानं अखेरची पोस्ट केली होती. त्यानं एक फोटो शेअर केला होता ज्यात तो खूपच वेगळा दिसत होता. त्याला ओळखणंही अवघड वाटत होतं. महाराष्ट्राचे गृहमंत्री अनिल देशमुख यांनी साईच्या निधनाची माहिती सोशलवरून दिली आहे.

अनिल देशमुख यांनी ट्विट केलं होतं की, “पीके सारख्या लोकप्रिय सिनेमात काम करून प्रेक्षकांची मने जिंकणारे अभिनेते साईप्रसाद गुंडेवार यांची कॅन्सरशी झुंज अखेर अपयशी ठरली आहे. भारतीय चित्रपटसृष्टीनं एक हरहुन्नरी अभिनेता गमावला आहे. भावपूर्ण श्रद्धांजली.”