प्लास्टिक मुक्त पुणे चा संदेश देत महिलांनी साजरी केली वटपौर्णिमा 

पुणे पोलीसनामा ऑनलाइन

वटपौर्णिमा नका साजरी करू फांद्या तोडून, आम्ही साऱ्या विनंती करतो हात जोडून… आम्ही आधुनिक युगाच्या नारी, प्लास्टिक प्रदुषणा विरोधात खंबीरपणे उभे राहण्याची आम्हा सर्वांची तयारी… अशाप्रकारे प्लास्टिक मुक्त पुणे चा संदेश देत कापडी पिशव्यांचे वाटप करून महिलांनी अनोख्या पद्धतीने वटपौर्णिमा साजरी केली.

आकांक्षा एज्युकेशनल अ‍ॅण्ड सोशल वेलफेअर फाऊंडेशनतर्फे वटपौर्णिमेनिमित्त पर्यावरणाविषयी व प्लास्टिक मुक्तीविषयी महिलांनी गोखले नगर परिसर व चतु:श्रुंगी मंदिर येथे जनजागृती केली. तसेच यावेळी महिलांना कापडी पिशव्यांचे वाटप देखील करण्यात आले. पुणे शहर भारतीय जनता पक्ष महिला आघाडीच्या उपाध्यक्षा व आकांक्षा सोशल वेलफेअर फाऊंडेशनच्या संस्थापिका डॉ. अपर्णा गोसावी, फाऊंडेशनच्या सचिव डॉ. आकांक्षा गोसावी, सुनीता जाधव, सुजाता गोडबोले, कोमल धोत्रे, किरण बदामी उपस्थित होते.

यावेळी डॉ. अपर्णा गोसावी म्हणाल्या, प्रदुषणामुळे पर्यावरणाचा -हास होत आहे. तसेच प्लास्टिक देखील पर्यावरणासाठी घातक आहे. प्लास्टिक ऐवजी कागदी अथवा कापडी पिशवीचा वापर केल्यास पर्यावरणाची हानी होणार नाही. कुटुंबातील महिलांमध्ये प्लास्टिक बंदीविषयी जनजागृती केली तर त्या हा संदेश सर्वांपर्यंत योग्यरित्या पोहोचवतील. प्लास्टिकमुळे होणारी पर्यावरणाची हानी टाळण्यासाठी तसेच याविषयी समाजात जागृती निर्माण करण्यासाठी महिलांनी वेगळ्याप्रकारे वटपौर्णिमा साजरी केली.