कृषी कायद्याबाबत शेतकरी मेळाव्यात काय बोलणार PM नरेंद्र मोदी, देशाचे लक्ष

नवी दिल्ली : सर्वोच्च न्यायालयाने नव्या कृषी कायद्यांना तुर्तास स्थगिती देता येईल का अशी विचारणा केली असून त्यावर केंद्र सरकारची भूमिका स्पष्ट झालेली नाही. मध्य प्रदेशातील शेतकरी मेळाव्याला पंतप्रधान नरेंद्र मोदी हे संबोधित करणार आहेत. त्यामुळे पंतप्रधान आज काय बोलणार याकडे सर्व देशाचे लक्ष लागले आहे.

मध्य प्रदेशातील ग्वॉल्हेरमध्ये हा शेतकरी मेळावा होत आहे. मध्य प्रदेशातील १५ हजार ग्रामपंचायतीमधील प्रतिनिधी या मेळाव्याला येणार आहेत. दुपारी दोन वाजता पंतप्रधान मोदी या मेळाव्याला व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे संबोधित करणार आहेत.

नव्या कृषी कायद्याविरोधात गेल्या २२ दिवसांपासून शेतकºयांचे आंदोलन सुरु आहे. या आंदोलनाची तीव्रता दिवसेंदिवस वाढत आहे़ केंद्रीय कृषी मंत्री नरेंद्रसिंह तोमर यांनी शेतकर्‍यांना चर्चेसाठी खुले पत्र लिहिले असून पंतप्रधानांनी त्यांच्या भूमिकेची प्रशंसा केली आहे. गुरुवारी भाजप मुख्यालयात गृहमंत्री अमित शहा, कृषिमंत्री नरेंद्रसिंह तोमर, वाणिज्यमंत्री पीयुष गोयल यांच्यासोबत झालेल्या बैठकीत भाजपच्या राष्ट्रीय सरचिटणीसांनी कृषी कायद्यावर चर्चा केली. पक्षाध्यक्ष जे. पी. नड्डाही व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे या चर्चेत सहभागी झाले होते. सर्वोच्च न्यायालयाची कृषी कायद्याला स्थगिती देण्याची विचारणा आणि शेतकर्‍यांचे तीव्र होत चाललेले आंदोलन यावर आता पंतप्रधान काय बोलणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.