मोदींचा संघर्षमय प्रवास उलगडणारा चित्रपट ‘पीएम नरेंद्र मोदी’

पुणे : पोलीसनामा ऑनलाईन – लोकसभा निवडणुकीच्या प्रचारादरम्यान आचारसंहिता लागू असल्यामुळे पीएम नरेंद्र मोदी चित्रपटाच्या प्रदर्शनाला निवडणूक आयोगाकडून परवानगी नाकारण्यात आली होती. अखेर, लोकसभा निवडणुकीचे निकाल लागल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या जीवनावरील चित्रपट प्रदर्शित झाला आहे. नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली लढल्या गेलेल्या लोकसभा निवडणुकीत भाजपला घवघवीत यश मिळाले आहे. या पार्श्वभूमीवर पीएम नरेंद्र मोदी हा चित्रपट प्रदर्शित झाला आहे. उमंग कुमार हे या चित्रपटाचे दिग्दर्शक आहेत.

कथा
चित्रपटाची कथा सोप्पी आहे. चित्रपटात नरेंद्र मोदी यांचा चहा विकण्यापासून ते पंतप्रधान होण्यापर्यंतचा प्रवास दाखवला आहे. चित्रपटाच्या कथेची सुरवात नरेंद्र मोदी यांना पंतप्रधानांचा उमेदवार घोषित करण्यात आलेल्या २०१३ मधील भाजपच्या बैठकीपासून सुरु होते. चित्रपटाच्या दरम्यान नरेंद्र मोदी यांचा संघर्ष दाखवण्यात आला आहे.घरची परिस्थिती अतिशय बेताची असल्याने त्यांची आई (जरीना वहाब) घरकाम करत असते तर वडील (राजेंद्र गुप्ता) चहा विकून आपल्या संसाराचा गाडा हाकत असतात. घराच्या परिस्थितीची चांगलीच जाणीव असल्याने नरेंद्र मोदी अभ्यास सांभाळून आपल्या वडिलांना त्यांच्या व्यवसायात मदत करत असतात. देशभक्ती, लोकांना मदत करण्याची भावना या गोष्टी बालपणापासूनच त्यांच्या मनात रुजलेल्या असल्याचे आपल्याला पाहायला मिळते. एका सामान्य व्यक्तीप्रमाणे आपल्याला जीवन जगायचे नाहीये हे त्यांनी खूपच कमी वयात ठरवले असते. त्यामुळे आपण संन्यास घेणार आहोत असे ते आपल्या पालकांना सांगतात आणि त्या वाटेने जाण्यासाठी काही वर्षं ते कुटुंबियांपासून वेगळे देखील राहातात. चित्रपटाचा शेवट २०१४ ला नरेंद्र मोदी यांच्या पंतप्रधान पदाच्या शपथेने होते. चित्रपट पाहिल्यावर असे वाटते कि विवेक ओबेरॉय आणि त्याची टीम काही महिने थांबली असती तर २०१९ ची झलक सुद्धा चित्रपटात दाखवू शकले असते. मोदींच्या जीवनात अनेक चढ उतार आले तरी त्यांनी मागे वळून पाहिले नाही. मोदींच्या जीवनात आलेले ते चढ उतार पाहण्यासाठी तुम्हाला चित्रपट पहावा लागेल.

दिग्दर्शन आणि अभिनय
चित्रपटाची कथेमध्ये अजून नवनिर्मिती करता आली असती. निर्माता संदीप सिंह यांनी लिहिलेल्या या चित्रपटाची कथा साधी असली तरी प्रभावी आहे. चित्रपटातील डायलॉग जबरदस्त आहेत. स्क्रीन प्ले आणि पटकथा देखील चांगली आहे. चित्रपटातील दृश्य स्थळे सुंदर आहेत. खास करून हिमालयात चित्रित केलेल्या काही सिनची सिनेमैटॉग्राफी खूप छान आहे. चित्रपटातील संगीत चित्रपटाला पुढे घेऊन जाण्यास मदत करते. या चित्रपटातील मोठा भाग हा नरेंद्र मोदी यांच्या भाषणांचा संग्रह वाटतो. चित्रपट पाहताना नरेंद्र मोदी यांच्या संबंधीची माहिती पदोपदी मिळते. पण ज्या गोष्टी सहजपणे कळू शकत नाहीत त्या गोष्टींवर अजून लक्ष दिले असते तर चित्रपट अजूनच चांगला झाला असतो. नरेंद्र मोदी यांचा हा पंतप्रधान पदापर्यंतचा प्रवास आपल्याला बऱ्यापैकी सगळ्यांनाच माहीत आहे. या चित्रपटात देखील आपल्याला तोच पाहायला मिळतो. त्यामुळे काही नवीन पाहायला मिळेल अशी आशा असणाऱ्या लोकांचा नक्कीच अपेक्षाभंग होतो.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भूमिका करणाऱ्या विवेक ओबेरॉयने चांगला अभिनय केला आहे. विवेकने तंतोतंत मोदींसारखा अभिनय करत भूमिकेला न्याय देण्याचा प्रयत्न केला आहे. अमित शहा यांच्या भूमिकेत मनोज जोशी यांनी उठावदार अभिनय केला आहे.

तुम्ही जर नरेंद्र मोदी यांचे चाहते असाल तर हा चित्रपट आवर्जून पहा.

चित्रपट – पीएम नरेंद्र मोदी

दिग्दर्शक – उमंग कुमार

कलाकार- विवेव ओबरॉय, मनोज जोशी, जरीना वहाब, राजेंद्र गुप्ता