‘स्पेशल सिक्युरिटी’ विना PM नरेंद्र मोदी यांची ‘गुरुद्वारा’ला भेट

नवी दिल्ली : वृत्त संस्था – पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज सकाळीच सुरक्षात्मक मार्ग आणि विशेष सुरक्षा व्यवस्था न घेता दिल्लीतील सीस गंज साहिबा गुरुद्वाराला भेट दिली. गुरु तेग बहादूर यांच्या ४०० व्या प्रकाशपर्वानिमित्त मोदी यांनी प्रार्थना केली.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सांगितले की, श्री गुरु तेग बहादूर यांचे धैर्य आणि दलित जनतेची सेवा करण्याच्या प्रयत्नांबद्दल त्यांचा जगभरात आदर केला जातो. अत्याचारी व अन्यायापुढे झुकण्यास त्यांनी नकार दिला. त्यांच्या सर्वोच्च बलिदानामुळे बळ मिळते आणि अनेकांना प्रेरणा मिळते.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज सकाळी अचानक दिल्लीतील सीस गंज साहिबा गुरुद्वाराला भेट दिली. त्यांनी कोणतीही विशेष सुरक्षा व्यवस्था बरोबर घेतली नव्हती. गुरुद्वारात आलेल्या भाविकांशी त्यांनी संवाद साधला.
गुरु तेग बहादूर हे शीख धर्माचे नववे गुरु होते. गुरु तेग बहादूर यांच्या ४०० व्या प्रकाशपर्वानिमित्त अमृतसरमधील सुवर्ण मंदिरात भाविकांनी सरोवरामध्ये स्रान केले. देशभरातील गुरुद्वारांमध्ये आज प्रार्थना करुन गुरु तेग बहादूर यांना अभिवादन केले जात आहे.