मी पोलिस हवालदार, मी तुझा इनचार्ज आहे असे म्हणणारा हवालदार निलंबीत

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन

तब्बल 54 दिवस सिकमध्ये राहिल्यानंतर पोलिस ठाण्यात हजर होवुन डॉक्टरांकडील प्रमाणपत्रावरील तारखांमध्ये खाडाखोड करून वरिष्ठांची दिशाभुल करणार्‍या आणि सहकारी पोलिस कर्मचार्‍यास मी पोलिस हवालदार आहे, मी तुझा इनचार्ज आहे, तु मला सांगु नकोस मला काय करावयाचे आहे ते मला माहित आहे असे बोलून अपमानित करणार्‍या मार्केटयार्ड पोलिस ठाण्यातील पोलिस हवालदारावर पोलिस उपायुक्‍त डॉ. प्रविण मुंढे यांनी निलंबनाची कारवाई केली आहे. त्याबाबतचे आदेश शुक्रवारी रात्री निर्गमीत करण्यात आले आहेत.

पोलिस हवालदार संजय सुधाकर माटेकर (बक्‍कल नं. 74) असे निलंबीत करण्यात आलेल्या हवालदाराचे नाव आहे. माटेकर हे सध्या मार्केटयार्ड पोलिस ठाण्यात कार्यरत होते. माटेकर हे दि. 18 सप्टेंबर 2017 ते 11 नोव्हेंबर 2017 दरम्यान 54 दिवस सिक रजेवर होते. त्यानंतर ते पोलिस स्टेशनमध्ये हजर झाले. त्यांनी डॉक्टरांकडील प्रमाणपत्रावरील तारखांमध्ये खाडाखोड करून वरिष्ठांची दिशाभुल केल्याचे समोर आले. पोलिस हवालदार माटेकर यांच्याकडे चोरीच्या एका गुन्हयाचा (भादंवि 379 – गुरनं 182/2017) तपास होता. त्या गुन्हयाच्या तपासासाठी माटेकर हे केरळ येथे गेले होते. तेथे माटेकर यांनी केरळ पोलिसांची मदत घेतली आणि आरोपीच्या ताब्यातुन मोबाईल घेतला. मोबाईल संदर्भातील दुकान विक्रेता, विकत घेणारा आणि मोबाईलचा वापर करणारा यांना माटेकर यांनी केरळ येथील स्थानिक पोलिस स्टेशन नेले नाही तर ते त्यांना एका लॉजवर घेवुन गेले. माटेकर यांनी संबंधितांना कायदेशीर कारवाईची भिती दाखविली आणि स्वतःचा आर्थिक फायदा करून घेवुन आरोपींना परस्पर सोडून दिले.

चोरीच्या गुन्हयाच्या तपासाकरिता हवालदार माटेकर यांच्यासह पोलिस कर्मचारी चव्हाण (बक्‍कल नं. 8804) हे देखील केरळला गेले होते. माटेकर हे मोबाईल हस्तक बिरेंद्र आणि त्याच्या चुलत भावाशी आर्थिक व्यवहार करीत असल्याचे पोलिस कर्मचारी चव्हाण यांच्या लक्षात आहे. त्यावेळी पोलिस कर्मचारी चव्हाण यांनी हवालदार माटेकर यांना वरिष्ठांच्या आदेशाची आठवण करून दिली. त्यावर माटेकर यांनी पोलिस कर्मचारी चव्हाण यांना मी पोलिस हवालदार आहे, मी तुझा इनचार्ज आहे, तु मला सांगु नकोस, मला काय करावयाचे आहे ते मला माहित आहे असे बोलुन अपमानित करीत त्यांच्याशी असभ्यपणाचे वर्तन केले. केरळ येथे चोरीच्या गुन्हयाचा तपास करून हवालदार माटेकर आणि पोलिस कर्मचारी चव्हाण हे पुण्यात पोहचले. माटेकर यांनी केरळ येथुन आणलेला मोबाईल हॅन्डसेट मार्केटयार्ड पोलिस ठाण्यातील मुद्देमाल कारकुन पोलिस हवालदार करलकर (बक्‍कल नं. 4070) यांच्या टेबलवर ठेवला आणि थोडयाच वेळात पंचनामा आणि इतर कागदपत्रे देतो असे सांगितले. मात्र, कुठलीही कागदपत्रे न देता हवालदार माटेकर हे परस्पर घरी निघुन गेले. पोलिस हवालदार संजय सुधाकर माटेकर यांनी आत्‍तापर्यंत कुठलीही कागदपत्रे हजर केली नाहीत. त्यामुळे दाखल गुन्हयाचा पुढील तपास खंडीत झाला आहे.

पोलिस हवालदार संजय सुधाकर माटेकर यांनी केरळ येथुन तपास करून आल्यानंतर गुन्हयाबाबतचा पंचनामा व केलेल्या तपासाची इतर कागदपत्रे सादर केली नाहीत तसेच ते दि. 24 जानेवारी 2018 ते दि. 18 मे 2018 दरम्यान एकुण 115 दिवस विनापरवाना कामावर गैरहजर राहिले त्यामुळे पोलिस उपायुक्‍त डॉ. प्रविण मुंढे यांनी त्यांना निलंबीत केले आहे. माटेकर यांच्या निलंबनाचे आदेश शुक्रवारी काढण्यात आले आहेत.