Pune News : ग्रामपंचायत निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पोलिसांचे कोम्बींग ऑपरेशन; 4 पिस्टल, 6 काडतुसे, 6 तलवारी, कोयते जप्त

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन –   सध्या राज्यामध्ये ग्रामपंचायत निवडणूकांची रणधुमाळी सुरु आहे. ग्रामपंचायत निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी प्रशासनाकडून खबरदारी घेतली जात आहे. पुणे ग्रामीण पोलिसांकडून  (Pune Rural Police) शनिवारी (दि.9) रात्री कोम्बींग ऑपरेशन करण्यात आले. यामध्ये 11 सराईत गुन्हेगारांच्या ताब्यातून 4 गावठी पिस्टल, 6 जिवंत काडतुसे, 6 तलवारी व कोयते, तसेच विना परवाना मद्य विक्री करणाऱ्या हॉटेलवर कारवाई करुन दारु जप्त करण्यात आली.

ही कारवाई पुणे ग्रामीण जिल्ह्यातील 7 उपविभागातुन एकूण 79 पथके तयार करुन करण्यात आली. यामध्ये 72 पोलीस अधिकारी व 377 पोलीस कर्मचाऱ्यांनी सहभाग घेतला होता. कोम्बींग ऑपरेशन दरम्यान रेकॉर्डवरील पिस्टल बाळगणाऱ्या 158 सराईत गुन्हेगारांची तपासणी करण्यात आली. स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने ऊरळी कांचन येथून सोमनाथ बाळासाहेब कांचन (वय-34 रा.ऊरळी कांचन) याला ताब्यात घेऊन त्याच्याकडून एक गावठी पिस्टल आणि एक जिवंत काडतुस असा एकूण 1 लाख 11 हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला.

भोर येथे केलेल्या कारवाईत आदर्श चंद्रकांत सांगळे (वय-28 रा. मंगळवार पेठ, भोर) याला ताब्यात घेऊन त्याच्याकडून 35 हजार 200 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. त्याच्याकडून गावठी पिस्टल आणि दोन जिवंत काडतुस जप्त करण्यात आली. शिरुर येथील कारवाईत हर्षल मनोहर काळे (वय-21 रा. ढोरआळी, शिरुर) याच्याडून 1500 रुपये किमतीच्या दोन तलवारी जप्त करण्यात आल्या. वडगाव मावळ पोलिसांनी केलेल्या कारवाईत जांभुळफाटा येथून रोहित संजय आंद्रे (वय-20 रा. कुसगाव) आणि वरुण अमोल वहीले (वय-19 रा. ढोरेवाडा, वडगाव) यांच्याकडून एक गावठी पिस्टल आणि दोन जिवंत काडतुसे असा एकूण 40200 रुपयांचा मुद्देमाल जप्त केला.

कामशेत पोलिसांनी रेल्वे गेटजवळ केलेल्या कारवाईत रुपेश विजय लालगुडे आणि प्रतिक अर्जुन निळकंठ यांच्या ताब्यातून एक गावठी पिस्टल, दोन जिवंत काडतुस आणि एक स्कुटर असा एकूण 50 हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. तसेच रेकॉर्डवरील 39 आरोपींना अटक करण्यात आली आहे. तर तीन तडीपार गुन्हेगारांना अटक करण्यात आली आहे. या शिवाय रात्री उशीरापर्यंत सुरु असणाऱ्या 38 हॉटेल्सवर कारवाई करण्यात आली. तसेच रांजणगाव पोलीस ठाण्याच्या हद्दीतून 21036 रुपयांची दारू जप्त करण्यात आली.