जामीनासाठी 18 हजारांची लाच घेताना पोलिस कर्मचारी सापडला ‘लाचलुचपत’च्या जाळ्यात !

पोलीसनामा ऑनलाईन, केज (जि.बीड), 9 डिसेंबर : जामीनासाठी अठरा हजार रूपयांची मागणी करून स्वीकारताना लाचलुचपत प्रपिबंधक विभागाच्या पथकाने एका पोलिस शिपायासह अन्य एकास बुधवारी रंगेहाथ पकडले. बीड जिल्ह्यामधील केज तालुक्यातील युसूफवडगाव पोलीस ठाण्यातील हि लाचखोरीची घटना समोर आली आहे.

लक्ष्मीकांत काशीराम पवार (वय 52, हुद्दा – पोलिस शिपाई) आणि सेवानिवृत्त होमगार्ड शेषेराव वैरागे (वय 58) अशी कारवाईत पकडलेल्यांची नावे आहेत.

या प्रकरणातील पोलिस कर्मचार्‍याने तक्रारदाराकडून जामीनसाठी 18 हजार रुपयांची लाच मागितली होती. त्यातील तडजोडीपोटी ठरलेले 9 हजार रुपये घेताना युसूफवडगाव ठाण्याच्या आवारात रंगेहाथ पकडले.

ही कारवाई लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या बीड पथकाने पोलिस उपअधीक्षक बाळकृष्ण हनपुडे यांच्या मार्गदर्शनाखाली केलीय. आरोपी विरोधात पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू होती.