डंपरने वाहतूक पोलिसाला चिरडले, ट्रॅफिक वॉर्डन गंभीर जखमी

दिंडोशी : पोलीसनामा ऑनलाइन – भरधाव वेगात जाणाऱ्या डंपरने वाहतूक नियमन करून जंक्शनवर जाणाऱ्या वाहतूक पोलिसाच्या गाडीला धडक दिली. या अपघातात दिंडोशी वाहतूक चौकीचे पोलीस नाईक यांचा मृत्यू झाला. ही घटना आज (बुधवार) दुपारी गोरेगाव परिसरात घडली आहे. तर ट्रॅफिक वॉर्डन जखमी झाला आहे. घटनेनंतर डंपर चालक पळून गेला असून पोलीस त्याचा शोध घेत आहे.

दिंडोशी वाहतूक चौकीचे पोलीस नाईक पांडुरंग मारुती सकपाळ यांचा अपघातात मृत्यू झाला आहे. तर भावेश पितळे असे जखमी झालेल्या ट्रॅफिक वॉर्डनचे नाव आहे. डंपर चालकाविरुद्ध वनराई पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलिस चालकाचा शोध घेत आहेत.

मिळालेल्या माहितीनुसार, पांडुरंग सकपाळ हे कांदिवली परिसरात वास्तव्यास होते. वर्षभरापासून ते दिंडोशी वाहतूक चौकीत कर्तव्यास होते. आज दुपारी सकपाळ आणि ट्रॅफिक वॉर्डन भावेश हे पश्चिम द्रुतगती महामार्गाच्या हब मॉल येथे वाहतूक नियंत्रणासाठी गेले होते. त्यानंतर ते दुचाकीवरून जंक्शनवर जात होते. तेव्हा पाठिमागून भरधाव वेगात आलेल्या डंपरची धडक सकपाळ यांच्या दुचाकीला बसली.

डंपरच्या धडकेत सकपाळ आणि भावेश हे खाली पडल्याने जखमी झाले. त्या दोघांना उपचारासाठी अंधेरीच्या होली स्पिरिट रुग्णालयात दाखल करण्यात आले. डॉक्टरांनी सकपाळ यांना तपासून मृत घोषित केले. तर भावेशवर सध्या उपचार सुरु आहेत. घटनेची माहिती मिळताच वनराई पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. पोलिसांनी डंपर जप्त केला आहे. अपघातानंतर चालक डंपर सोडून पळून गेला आहे. पोलिस त्याचा शोध घेत आहेत. सकपाळ यांच्या पश्चात पत्नी आणि मुले असा परिवार आहे.