वाहतूक नियमांचे महत्व पटवून देण्यासाठी पोलिसांची अनोखी शक्कल

नवी मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन-दुचाकीस्वारांना हेल्मेटची सक्ती करूनही नियमांचे पालन होत नसल्याने वाहतूक पोलिसांनी अनोखी मोहीम हाती घेतली आहे. त्याअंतर्गत शासकीय इमारती, खासगी कार्यालये, वाणिज्य कॉम्प्लेक्स यामध्ये विना हेल्मेट दुचाकीस्वारांना प्रवेशबंदी करण्यात आली आहे. त्यानुसार पालिका मुख्यालयात देखील हेल्मेट घातलेल्या दुचाकीस्वारांनाच प्रवेश देण्यात येत आहे.

रस्ते अपघातांच्या घटनांना आळा बसावा व त्यामधून दुचाकीस्वारांचे प्राण वाचावेत यासाठी दुचाकीस्वारांना हेल्मेटची सक्ती करण्यात आली आहे. गतवर्षापूर्वी हेल्मेट असेल तरच पेट्रोल देण्याचाही निर्णय झालेला. कालांतराने असे सक्तीचे निर्णय बारगळत असल्याने अद्यापही विना हेल्मेट दुचाकी चालवणाऱ्यांचे प्रमाण अधिक आहे. यामुळे त्यांना हेल्मेटचे महत्त्व पटवून देण्याचा अभिनव उपक्रम नवी मुंबई वाहतूक पोलिसांकडून सातत्याने होत आहेत. अखेर विशेष मोहिमा राबवून नियमांचे उल्लंघन करणाऱ्या चालकांवर कारवाया करण्यात आल्या. त्यानंतरही हेल्मेटच्या वापराला बगल देणाऱ्या दुचाकीस्वारांसाठी अनोखी मोहीम वाहतूक पोलिसांनी हाती घेतली आहे. हेल्मेट घातलेले असेल तरच शासकीय इमारतीत, वाणिज्य संकुलात तसेच रहिवासी सोसायट्यांमध्ये प्रवेश देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

या निर्णयाचे स्वागत करत नवी मुंबई महापालिका मुख्यालयासह अनेक वाणिज्य संकुल व्यवस्थापनांनी अंमलबजावणीला सुरवात केली आहे. त्यानुसार एपीएमसी वाहतूक पोलिसांनी देखील परिसरातील रहिवासी सोसायट्या, वाणिज्य कॉम्प्लेक्स, मॉल व्यवस्थापनांची भेट घेवून त्याची माहिती दिली. शिवाय परिसरात जनजागृती रॅली काढून दुचाकीस्वारांना हेल्मेटच्या वापराचे महत्त्व पटवून देण्यात आले.