महिलेस ताटकळत ठेवणाऱ्या पोलीस निरीक्षकाची उचलबांगडी

उस्मानाबाद : पोलीसनामा ऑनलाईन

एका वरिष्ठ शिक्षणाधिकाऱ्याविरोधात तक्रार देण्यासाठी गेलेल्या महिलेला आनंदनगर पोलिसांनी 18 तास ताटकळत बसवून ठेवले होते. उस्मानाबादमधील या प्रकाराची वरिष्ठ पातळीवर दखल घेण्यात आली असून त्या पोलीस निरीक्षकाची उचलबांगडी करण्यात आली आहे.

याप्रकरणी शहरातील आनंदनगर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक डी. बी. घात यांची उचलबांगडी करण्यात आली आहे. शिवाय अन्य कर्मचारी आणिअधिकाऱ्यांवरही खात्यांतर्गत कारवाई करण्यात येणार असल्याची माहिती पोलीस अधीक्षक पंकज देशमुख यांनी दिली आहे.

काय घडला होता प्रकार

सदर महिला ही एका वरिष्ठ शिक्षण अधिकाऱ्याविरुद्ध तक्रार नोंदवायला आलेली होती. ही महिला तक्रार देण्यासाठी सकाळी 11 वाजता पोलीस स्टेशनला गेली. मात्र तिची तक्रार पोलिसांनी नोंदवून घेतली नाही. तपास अधिकारी दिवसभर बदलत राहिले परंतु महिलेकडे कुणी लक्ष दिले नाही. शेवटी या महिलेने रात्री अडीच वाजता पोलीस मदत केंद्राला फोन केला. त्यानंतरही पोलिसांनी गुन्हा दाखल करून घेतला नाही. शेवटी कंटाळून दुसऱ्या दिवशी पहाटे पाच वाजता ही महिला निघून गेली. सकाळी अकरा ते दुसऱ्या दिवशी पहाटे पाच वाजेपर्यंत महिलेला पोलीस स्टेशन मध्ये बसवून ठेवण्यात आले परंतु तिची तक्रार नोंदवून घेतली नाही.

पोलीस अधीक्षकांनी या घटनेच्या चौकशीचे आदेश दिले होते. त्यानंतर आता हलगर्जीपणा करणाऱ्या कर्मचाऱ्याची प्रशासनाकडून उचलबांगडी करण्यात आली आहे.

संबंधित घडामोडी:

पोलिसांचा असंवेदनशीलपणा ; विनयभंगाच्या तक्रारीसाठी महिलेला १८ तास बसवून ठेवले