दुर्देवी ! पोलीस निरीक्षक उत्तम जाधव यांचे निधन

जत : पोलीसनामा ऑनलाइन – राज्यात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत आहे. लॉकडाऊन काळात अहोरात्र झटणाऱ्या पोलिस दलातील अनेक पोलीस अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना कोरोनाची लागण झाली आहे. जत पोलीस ठाण्याचे पोलिस निरीक्षक उत्तम जाधव (वय-50 मूळ रा. सौंदरे ता. बार्शी, जि. सोलापूर) यांचे कोरोनामुळे नुकतेच निधन झाले आहे. जाधव यांच्यावर सांगली येथील खासगी रुग्णालयात उपचार सुरु होते. उपचारादरम्यान आज (रविवार) पहाटे प्राणज्योत मालवली. त्यांच्या निधनामुळे हळहळ व्यक्त केली जात आहे.

उत्तम जाधव यांचा जन्म बार्शी तालुक्यातील सौंदरे येथील एका गरीब शेतकरी कुटुंबात झाला होता. त्यांनी मुंबई, सोलापूर ग्रामीण, उस्मानाबाद येथे पोलीस निरीक्षक म्हणून चांगली कामगिरी केली होती. त्यांची उस्मानाबाद येथून जत पोलीस ठाण्यात 13 ऑगस्ट 2020 रोजी बदली झाली होती. कोरोनाच्या काळात त्यांनी जनजागृती करण्याचे चांगले काम केले होते.पदभार स्विकारल्यानंतर त्यांनी गुन्हेगारांवर चांगला वचक बसवला होता. तसेच त्यांनी जत पोलीस ठाण्याचे सुशोभीकरण केले होते.

उत्तम जाधव यांचा 2 मे रोजी कोरोनाचा अहवाल पॉझिटिव्ह आला होता. जत येथील कोव्हिड सेंटरमध्ये त्यांच्यावर उपचार सुरु होते. त्यानंतर प्रकृती खालावल्याने त्यांना 5 मे रोजी सांगली येथील एका खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले. शरीरात निमोनियाचे प्रमाण वाढल्याने त्यांना व्हेंटिलेटरवर ठेवण्यात आले होते. रविवारी पहाटे त्यांचे उपचारादरम्यान निधन झाले. त्यांच्या पश्चात आई-वडील, भाऊ, एक मुलगा व मुलगी असा परिवार आहे.