सोलापूर ग्रामीण पोलिसांच्या मदतीला लातूरसह इतर घटकातील पोलिस

सोलापूर : पोलीसनामा ऑनलाइन – सोलापूर जिल्ह्यातील कोरोनाचा प्रादुर्भाव अधिक वाढल्याने याला अटकाव करण्यासाठी पोलीस प्रशासन अधिक जबाबदारीने आपलं कर्तव्य निभावत आहे. सोलापूर ग्रामीण पोलिसांकडून संचारबंदीचे कठोर अंमलबजावणी करत आहेत. कारण नसताना कोणी बाहेर पडल्यास त्यांच्यावर कडक कारवाई केली जात आहे. अनेक गावातील भागात पोलीस अधिक लक्ष ठेऊन आहेत. यावरून आता येथील ग्रामीण पोलीस प्रशासनाच्या मदतीला पुणे लाेहमार्ग, लातूर आणि सोलापूर पोलीस प्रशिक्षण केंद्रातील अधिकारी, कर्मचारी तसेच राज्य राखीव पोलीस दल हे बंदोबस्तासाठी तैन्यात झाले आहे.

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सरकारने राज्यात कठोर निर्बंध लागू केले आहे. यावरून अनेक जिल्ह्यात पोलीस बंदोबस्तासाठी आणि राज्याने लागू केलेल्या संचारबंदीचे अंमलबजावणीसाठी सज्ज आहेत. ग्रामीण पोलिसांनी सोलापूर ग्रामीणच्या पोलीस अधीक्षक तेजस्वी सातपुते, अप्पर पोलीस अधीक्षक अतुल झेंडे यांच्या मार्गदर्शनाखाली २८ ठिकाणी नाकाबंदी सुरू ठेवली आहे. या व्यतिरिक्त लहान आणि मोठे धरून एकूण १७३ रस्ते बंद करण्यात आले आहेत. कोरोनाला रोखण्यासाठी ग्रामीण पोलिसांकडून विविध निर्बंध लादण्यात येत आहेत. तसेच येथील तालुक्यातील शिवाय विविध तालुक्यातील हॉटस्पॉट गावांना एसपी आणि अप्पर पोलीस अधीक्षक हे स्वतःहून जाऊन सर्वत्र पाहणी करत आहेत.

या दरम्यान, ग्रामीण भागातील कोरोनाला रोखण्यासाठी आणि कारण नसताना बाहेर लोकांवर लक्ष ठेवण्यासाठी ग्रामीण पोलीस व्हिलेज टास्क फोर्स स्थापन करण्यात येणार आहे. यामध्ये पोलीस ठाण्याचे बीट अंमलदार, ग्रामसेवक, पोलीसपाटील, तलाठी, सरपंच, होमगार्ड यांचे संयुक्त पथक तयार करण्यात येणार असल्याची माहिती ग्रामीण पोलिसांनी दिली आहे. तसेच, अप्पर पोलीस अधीक्षक अतुल झेंडे म्हणाले, नागरिकांनी विनाकारण घराबाहेर पडू नये, कारण नसताना एका गावातून दुसऱ्या गावाला जाऊ नये, अत्यावश्यक कामासाठी बाहेर पडताना मास्क, फिजिकल डिस्टन्सचे पालन करावे. स्वत:ची व कुटुंबाची काळजी घ्यावी आणि प्रशासनाने दिलेल्या सर्व नियमांचे पालन काटेकोरपणे करावे असे ते म्हणाले.

सोलापूर ग्रामीणमध्ये बंदोबस्तात तैन्यात असणारे पोलीस अधिकारी, कर्मचारी –

साेलापूर ग्रामीण पोलीस – २५००
होमगार्ड – ९५०
पुणे लाेहमार्ग पोलिस – २५
लातूर पोलिस प्रशिक्षण केंद्र – २५
सोलापूर प्रशिक्षण केंद्र – २५
इतर – २००