स्पर्धा परीक्षेच्या नोट्स, लग्नाच्या आमिषाने PSI कडून युवतीवर लैंगिक अत्याचार

शिराळा : पोलीसनामा ऑनलाईन-मुंबई येथील बांद्रा पोलीस ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक (PSI) उदय रामचंद्र काळे (मुळगाव-सरूड, ता.शाहूवाडी) यांनी लग्नाचे आमिष दाखवून २५ वर्षीय युवतीवर वारंवार बलात्कार केल्या प्रकरणी शिराळा पोलिसात गुन्हा नोंद करण्यात आला आहे. त्यामुळे प्रचंड खळबळ उडाली आहे.

शिराळा पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, पीडित युवती परिसरातील एका महाविद्यालयात शिकत आहे. तिची २० जून २०१६ रोजी उदय याच्याशी ओळख झाली. नंतर उदयने तू स्पर्धा परीक्षेचा अभ्यास कर मी तुला नोट्स देतो असे सांगितले. २९ ऑगस्ट २०१६ रोजी मी तुझ्याशीच लग्न करणार असल्याचे त्याने युवतीस सांगितले. तो इतर मित्र मैत्रिणींनाही लग्न करणार असल्याचे सांगत होता.

दि. १५ नोव्हेंबर २०१६ रोजी पीडित युवतीचा वाढदिवस होता. यावेळी ते दोघे वाढदिवस साजरा करण्यासाठी (एमएच -०९-९५०१) मोटारसायकल वरून शिराळा येथील हॉटेलमध्ये वाढदिवस साजरा करण्यासाठी गेले. त्यानंतर त्याने लग्न करणार आहोत असे म्हणून युवतीच्या विरोधाला डावलुन जबरदस्तीने तिच्याशी शारीरिक संबंध ठेवले. यानंतर वारंवार याच हॉटेल मध्ये लग्नाच्या आमिषाने बलात्कार केला.

सप्टेंबर २०१७ पासून मी तुच्याशी लग्न करणार नसल्याचे सांगून बोलणे व फोन घेणे बंद केले. याबाबत या युवतीने शाहूवाडी पोलीस ठाण्यात तक्रार दिली होती.मात्र सदरची घटना शिराळा येथे घडल्याने शिराळा पोलिसात गुन्हा नोंद करण्यात आला आहे. पुढील तपास सहायक पोलिस निरीक्षक स्वप्नील घोंगडे करत आहेत. या प्रकरणामुळे खळबळ उडाली आहे.