दुर्दैवी ! महिनाभरापूर्वी लग्न झालेल्या 32 वर्षाच्या पोलीसाचा नदीपात्रात बुडून मृत्यू

सांगली : पोलीसनामा ऑनलाइन – अवघ्या महिनाभरापूर्वी लग्न झालेल्या एका पोलीस कर्मचाऱ्याचा कसबे डिग्रज (ता. मिरज) येथे कृष्णा नदीत बुडून दुर्दैवी मृत्यू झाला. शुक्रवारी (दि. 9) सांयकाळी 5 वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली.

सुनील गणपतराव पाटील (वय 32, रा. माधवनगर, ता. मिरज) बुडून मृत्यू झालेल्या पोलीस कर्मचाऱ्याचे नाव आहे. ते मुंबईत पोलीस दलात कार्यरत होते.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पाटील आणि त्यांचे काही मित्र शुक्रवारी दुपारी पार्टी करण्यासाठी डिग्रज बंधारा येथे गेले होते. त्या ठिकाणी जेवण झाल्यानंतर सायंकाळी साडेपाचच्या सुमारास काही मित्र नदीवर अंघोळीसाठी गेले. पाटीलही नदी काठावर गेले. परंतु, मित्रांनी पाटील यांना नदीपात्रात न जाता काठावर अंघोळ करण्याचा सल्ला दिला. परंतु पाटील यांनी मित्रांना मला पोहता येते असे सांगून पात्रात पोहण्यासाठी उतरले. नदीपात्रातून काठावर येताना त्यांना पाण्याचा अंदाज न आल्यान ते बुडाले. पाटील बुडत असल्याचे लक्षात येताच मित्रांनी आरडा-ओरडा केला. एका मित्राने त्यांना वाचविण्यासाठी नदीत उडी मारली. परंतु त्यांना यश आले नाही. या घटनेची माहिती मिळताच सांगली ग्रामीण पोलीसांनी घटनास्थळी धाव घेतली. रात्री उशिरापर्यंत पाटील यांचे शोधकार्य सुरू होते. पुन्हा शनिवारी सकाळी शोध मोहीम सुरू केली. आयुष्य सेवाभावी संस्था, विश्वसेवा व हेल्पलाईन रेस्क्यू टीमच्या पथकाने पाटील यांचा मृतदेह शोधून काढला. याबाबत सांगली ग्रामीण पोलिस ठाण्यात नोंद केली आहे.