पोलीस कर्मचाऱ्याची आत्महत्या, FB Live मध्ये पोलिस दलाला ठरवले जबाबदार (Video)

पीलभीत : वृत्तसंस्था – उत्तर प्रदेश पोलिसातील अंतर्गत वाद अनेकदा चव्हाट्यावर आले आहेत. मागील वर्षी एका महिला उपनिरीक्षकाने आत्महत्या केली होती. वरिष्ठांकडून मानसिक छळ होत असल्याचा आरोप केला होता. यानंतर आणखी एक प्रकार समोर आला आहे. एका पोलीस कर्मचाऱ्याने फेसबुक लाईव्ह करुन वरिष्ठांकडून छळ होत असल्याचा गंभीर आरोप केला. फेसबूक लाईव्ह केल्यानंतर या पोलीस कर्मचाऱ्याने डोक्यात गोळी घालून घेत आत्महत्या केली. ही घटना पीलीभीतच्या बीसलपूर कोतवाली येथे घडली आहे. जितेंद्र चौहान असे आत्महत्या केलेल्या पोलीस शिपायाचे नाव आहे.

पोलीस विभागात होत असलेल्या छळाला कंटाळून जितेंद्र यांनी आत्महत्या केली असे बोलले जात आहे. फेसबुक लाईव्हमध्ये त्यांनी याचा वारंवार उल्लेख केला आहे. जितेंद्र चौहान यांच्या आत्महत्येनंतर उत्तर प्रदेश पोलीस विभागावर पुन्हा एकदा प्रश्न चिन्ह उपस्थित झाले आहे. जितेंद्र चौहान हे शामलीच्या उस्मानपूरा येथे राहणारे होते. 2016 मध्ये ते पोलीस दलात दाखल झाले होते. सध्या ते बीसलपूरच्या कोतवाली येथे 100 नंबरच्या गाडीवर तैनात होते. तर त्यांची पत्नी सरिता चौहान या देखील बीसलपूरच्या कोतवाली येथे तैनात आहेत. चौहान यांचा मृतदेह कारमध्ये आढळून आला.

पोलिसांनी केलेल्या प्राथमिक तपासात ही आत्महत्या असल्याची शक्यता वर्तवली आहे. मात्र, घटनास्थळी एकही शस्त्र सापडलं नाही. त्यामुळे त्यांनी गोळी मारून आत्महत्या केली तर ती बंदूक गेली कुठे ? असा प्रश्न उपस्थित होत आहे. पोलीस या घटनेचा सर्व बाजूंनी तपास करत आहेत. दुसरीकडे असे सांगण्यात येत आहे की, जितेंद्र चौहान यांना सुट्टी न मिळाल्याने ते वरिष्ठांवर नाराज होते. पोलीस अधिकाऱ्यांनी मात्र हे आरोप फेटाळून लावले आहेत. तसेच कौटुंबिक कलहातून त्यांनी हे पाऊल उचलले असे म्हटले. काही दिवसांपूर्वीच जितेंद्र यांची पत्नी सारिका यांची बिलसंडा पोलीस ठाण्यातून बदली होऊन बीसलपूर येथे झाली होती.

घटनेच्या दोन ते तीन दिवस आधीपासून पती-पत्नीमध्ये वाद सुरु होते. शनिवारी दुपारी जितेंद्र यांनी फेसबुक लाईव्ह करत रडत रडत व्हिडीओ बनवला होता. यामध्ये ते म्हणतात की, मी खूप कंटाळलोय, माझी जगण्याची इच्छा नाही मी आत्महत्या करायला चाललोय, असं ते सांगत होते. त्यावेळी जितेंद्र गाडी चालवत असल्याचे दिसून येते. जितेंद्रचं फेसबुक लाईव्ह पाहताच त्यांच्या सहकाऱ्यांनी त्यांना वाचवण्यासाठी धाव घेतली. मात्र, त्यापूर्वीच जितेंद्र यांनी स्वत:वर गोळी मारल्याची घटना घडली.