कदरदान, खतरनाक, कादर खान यांच्या जीवनगाथेवर पोलीसनामा चा खास रिपोर्ट

मुंबई : अक्षय पुराणिक – अफगानिस्तानच्या काबुलजवळच्या खेड्यात त्या मातेची ३ मुलं दगावली. चौथा मुलगा झाला तेव्हा ती नवऱ्याला म्हणाली, इथलं वातावरण काही बरं नाही, आपण हा देश सोडून जाऊया. नवरा बायको अन ते बाळ पाकिस्तानमार्गे भारतात आले. सरतेशेवटी मुंबईतल्या सर्वात गलिच्छ झोपडपट्टीत कामाठीपुऱ्यात वास्तव्य जिथे दारूडे, चोरटे, बदफैली, दिवसाढवळ्या वेश्या व्यवसाय, दरोडे, खून होत अशा वातावरणात हे कुटुंब कसेतरी आपले दिवस ढकलंत होतं, या अशा परिस्थितीत नवरा बायकोमध्ये भांडणं होऊ लागली. याचा शेवट ते दोघे कायमचे वेगळे झाले .
तरूण पठाणी स्रीला अशा गढूळ वस्तीत एकटं टिकणं अवघड होतं, पाकिस्तानातून तिचे आई आणि भाऊ आले, आणि त्यांनी तिचं दुसरं लग्न लावून दिलं. त्या कमनशिबी मुलानं आईचं दुसरं लग्न बघितलं, पण नशिबाचे भोग त्याहून वाईट होते. त्या छोट्या बाळाचा सावत्र बाप दमडी कमवत नव्हता. त्या छोट्या मुलाला तो त्याच्या पहिल्या बापाकडे पैसे मागायला पाठवायचा. तो छोटा मुलगा कामाठीपुऱ्यापासून ३ किमी बापाकडे चालत जात एका दोन रुपयाची भिक मागायचा, त्याचे वडिल म्हणायचे “बेटे मै कहा से पैसे दुं, मै खुद मस्जिद मे पेशेमाम हुं,” पण कुठूनतरी ते दोन रुपये उसने घेऊन त्या मुलाला परत पाठवत, त्या दोन रुपयाच पीठ, डाळ विकत घेऊन आठवड्यात ३ दिवस जेवायचं आणि ४ दिवस उपाशी राहायचं.
या हालाखीतून बाहेर पडण्यासाठी त्या मुलानं ५ व्या वर्षी मजुरीला जायचं ठरवलं. घराबाहेर पडणाऱ्या त्या मुलाच्या खांद्यावर त्या आईनं हात ठेवला. ती म्हणाली, “मै जानती हुं तू कहा जा रहा है, तू तीन चार रूपये कमाने जा रहा है, ताकी घर की गरीबी ना रहे, तेरे घर मे मुफलिसी ना रहे, भुक ना रहे, लेकिन बेटा इस गरीबी से टकराने के लिए मै हुं, तू एक काम कर तू सिर्फ पढ”
आईचं ते शब्द त्या मुलानं लक्षात ठेवले, आणि डिग्रीपर्यंतचं शिक्षण पूर्ण केलं. आयुष्याच्या हाल अपेष्टांनी या मुलाला जीवनाचं सार कळलं. आजूबाजूची लोकं बघून तो लिहू लागला, नक्कल करू लागला. दिवसभरात सुचलेलं कागदावर उतरवून ते घराजवळच्या कबरस्तानमध्ये जाऊन मोठ्यानं वाचू लागला.
एके रात्री असंच अचानक त्या मुलाच्या चेहऱ्यावर कोणीतरी टॉर्च चमकवली, त्याला बोलावत विचारलं की “तू काय करतोस”, मुलगा म्हणाला “मी हे स्वतः लिहितो आणि इथे वाचत बसतो”, समोरच्या व्यक्तीनं विचारलं “ड्रामा मे काम करते हो क्या?” तो मुलगा म्हणाला, “ड्रामा म्हणजे काय?” त्या व्यक्तीनं त्या मुलाला बंगल्यावर बोलवून त्याला २०० रुपये दिले आणि आशीर्वाद दिला, “की या २०० रुपयांचे उद्या २ लाख , दोन कोटी होतील, आणि झालंही तसंच”
ज्या मुलाच्या आयुष्याचा अंधार अंगावर काटा उभा करतो, बदनशिबीपणा आपल्याला कावरंबावरं करून सोडतो, भुक, गरीबी, लाचारीचं हे जगणं आपण कवचितच कुठे पाहिलं असेल, ऐकलं असेल. पण या सगळ्यावर मात करत आहे त्या नशिबाला स्वीकारत तो पुढे जात राहिला. आपल्या आईचं दुःख तो लिहीत गेला. त्याच सच्चेपणातून हा लेखक घडला आणि त्याच सच्च्या संवादांनी त्याला महान अभिनेता बनवलं.. ते होते कादर खान साहेब..    ज्याचं जगणं हीच प्रेरणा होती.
कादर खान यांच्याबद्दल न ऐकलेल्या तीन गोष्टी 
आईवर उपचार करण्यासाठी डॉक्टरला खांद्यावर उचलून घेऊन आले होते कादर खान 
कादर खान यांनी एका मुलाखतीत आपल्या आईच्या निधनाबद्दल सांगितलं होतं. कादर खान एका स्पर्धेसाठी बाहेर गेले होते. घरी आल्यावर त्यांनी पाहिलं तर आईला रक्ताच्या उलट्या होत होत्या. एका भांड्यात ती उलटी करुन ते सगळं रक्त बाथरुममध्ये ओतून देत होती. हे चित्र पाहून कादर खान प्रचंड घाबरले. त्यांनी आईला विचारलं असता तिने थोडासा त्रास होत असल्याचं सांगितलं. यावर कादर खान तू मला हे आधी का सांगितलं नाहीस विचारत चिडले आणि डॉक्टरला आणण्यासाठी घराबाहेर पडले. पण डॉक्टर त्यांच्यासोबत येण्यास तयार होत नव्हता. यावेळी त्यांनी चित्रपटातील एखाद्या सीनप्रमाणे डॉक्टरला खांद्यावर उचलून घेतलं आणि घरी आणलं. घरी आल्यानतंर डॉक्टरने तपासलं तेव्हा त्यांचा आईचा मृत्यू झाला होता.
…या प्रसंगामुळे कादर खान झाले विनोदी अभिनेता
कादर खान यांनी 1973 मध्ये ‘दाग’ चित्रपटातून अभिनयात पदार्पण केलं. 300 हून अधिक चित्रपटांमध्ये त्यांनी काम केलं. नाटकापासून आपल्या करिअरची सुरुवात करणाऱ्या कादर खान यांनी अनेक चित्रपटांसाठी संवादलेखनदेखील केलं. 250 पेक्षा जास्त चित्रपटांचं संवाद लेखन त्यांनी केलं. त्यांची लेखणी आणि अभिनय वेगळंच रसायन होतं. त्यांनी लिहिलेल्या संवादातून समाजातील भीषण वास्तव मांडण्याचा ते प्रयत्न करत असत. आपल्या अभिनयाने प्रेक्षकांचं दिलखुलास मनोरंजन करणारा एक उत्तम अभिनेता म्हणून कादर खान यांना ओळखलं जायचं.तीन दिवस जेवायचं आणि तीन दिवस भुकेल्या पोटी झोपायचं, कादर खान यांचा संघर्ष
संवादलेखनासाठी मिळालेल्या १५०० रुपयांपासून ते २१ हजार रुपयांचं मिळालेलं ते पाकीट या गोष्टींमुळे कादर खान यांच्या आयुष्यात महत्त्वाचं वळण आलं. ‘जवानी दिवानी चित्रपटासाठी संवादलेखनाचं काम संपलं होतं. असंच एके दिवशी मी रस्त्याने चालत असताना एक कार येऊन माझ्या बाजूला थांबली. कारमधून एक माणूस बाहेर आला आणि माझ्या चित्रपटात काम करणार का असा प्रश्न विचारला. मला विद्यार्थ्यांना शिकवायचं असतं असं कारण मी त्यांना दिलं. त्यांनी माझ्या हातात एक पाकिट ठेवलं. ते पाकिट इतकं जड होतं की रस्त्याच्या एका बाजूला जाऊन मला तो खोलावं लागलं. त्यात तब्बल २१ हजार रुपये होते. इतके पैसे पाहून माझे डोळेच विस्फारले गेले,’ असं कादर खान यांनी त्या मुलाखतीत सांगितलं. त्यांच्या हातात पाकिट ठेवणारा व्यक्ती होता रवी मल्होत्रा, ‘खेल खेल मैं’ या चित्रपटाचे निर्माते.

अशा प्रकारे आयुष्याच्या विविध वळणांतून कादर खान यांनी चित्रपटसृष्टीत स्वत:चं वेगळं स्थान निर्माण केलं. त्यांच्या निधनानंतर संपूर्ण कलाविश्वात शोककळा पसरली आहे.