पूजा चव्हाण प्रकरणाला नवं वळण ! ‘तो’ आवाज माझ्या मुलाचा नाही, अरुणच्या आईचा खुलासा

बीड : पोलीसनामा ऑनलाइन – पूजा चव्हाण आत्महत्या प्रकरणी भाजपनं आरोप केला होता की, मंत्री संजय राठोड यांच्या सोबत असलेल्या प्रेमसंबंधातून तिनं हे पाऊल उचललं आहे. या प्रकरणी भाजपकडून पुरावा म्हणून काही ऑडिओ क्लीप्सही देण्यात आल्या आहेत. यातील आवाज कोणाचा आहे याचा तपास सध्या सुरू आहे. या प्रकरणी अरुण राठोड या तरूणाचं नावही प्रखरतेनं पुढं येताना दिसत आहे. अरुणची आई मीराबाई सुभाष राठोड यांनी ऑडिओ क्लीपमधील संभाषण हे अरुण आणि कथित मंत्री यांचं नसल्याचा दावा केला आहे. सध्या अरुण गायबच आहे.

अरुण राठोड याचं कुटुंब 4 दिवसांनंतर गावात आलं आहे. अरुण मात्र त्यांच्या सोबत आलेला नाही. तो अजूनही गायबच आहे. धक्कादायक बाब अशी की, अरुणच्या घरी लाखो रुपयांची चोरी झाल्याचंही समजत आहे.

अरुण बीड जिल्ह्यातील परळीच्या धारावती तांडा येथे राहतो. पूजा चव्हाण प्रकरणी अरुणचं नाव पुढं आल्यानंतर गेल्या काही दिवसांपासून त्याच्या घराला कुलूप लावण्यात आलं होतं. अरुणची आई मीराबाई राठोड यांनी याबाबत खुलासा केला आहे. इतकंच नाही तर त्या ऑडिओ क्लीपमधील संभाषण अरुण आणि कथित मंत्र्याचं नसल्याचा दावा त्यांनी केला आहे. सध्या अरुण कुठे आहे हे त्यांनाही माहित नसल्याचं त्यांनी सांगितलं आहे.

येत्या 25 तारखेला अरुणच्या बहिणीचं लग्न होतं. यासाठी सोनं खरेदी केलं होतं. घरात आता लाखोंची चोरी झाली आहे. यामुळं आता कुटुंबावर संकट ओढवलं आहे असंही मीराबाई यांनी सांगितलं आहे.

नगरपालिकेतील नोकरी गेल्यानंतर अरुण पुण्याला गेला होता. त्याला बहिणीचं लग्न करायचं होतं. त्यामुळं तो एकेक रुपया गोळा करत होता. त्याचा यात काहीच दोष नाही. या प्रकरणात तो नव्हता अशी माहिती अरुणच्या आईनं दिली आहे.