पूजा चव्हाण आत्महत्या प्रकरण : संवेदनशील प्रकरणात चौकशीपूर्ण होईपर्यंत कोणाचे नाव जोडणे अयोग्य – मंत्री एकनाथ शिंदे

औरंगाबाद : पोलीसनामा ऑनलाइन – परळी येथील पुण्यात आलेली पूजा चव्हाण हिने आत्महत्या केली. मात्र या प्रकरणावरून राजकरणात खळबळ उडाली आहे. तर दुसरीकडे म्हणजे पूजा चव्हाण हिच्या आत्महत्येला एका शिवसेनेच्या मंत्राचे नाव पुढे आले आहे. तर या प्रकरणावर शिवसेना नेते आणि नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांनी प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. हे प्रकरण अत्यंत संवेदनशील व दुर्दैवी आहे. चौकशी पूर्ण होईपर्यंत कोणाचे नाव जोडणे व अधिक बोलणे योग्य होणार नाही असे त्यांनी म्हंटले आहे. शिंदे हे औरंगाबाद येथे बोलत होते.

मंत्री एकनाथ शिंदे म्हणाले, हे प्रकरण अत्यंत संवेदनशील आहे. यामुळे यात चौकशी पूर्ण होईपर्यंत कोणाचेही नाव जोडणे योग्य नाही. या दुर्दैवी प्रकरणात चौकशीअंती खरे काही पुढे येईल तोपर्यंत यावर अधिक बोलणे योग्य नाही, असेही शिंदे यांनी म्हंटले आहे.

दरम्यान, पूजा चव्हाण (वय,२२) ह्या तरुणीने पुण्यात आत्महत्या केल्यानंतर आता या प्रकरणाला गंभीर वळण लागले आहे. महाविकास आघाडीमधील शिवसेनेच्या एका मंत्र्याचे नाव या प्रकरणात आले आहे. याबाबत काही ऑडीओ क्लीप सोशल मीडियात व्हायरल झाल्या आहेत. यामुळे विरोधकांनी शिवसेनेला कोंडीत पकडले आहे. तसेच भाजपने हा मुद्दा लावून धरत शिवसेनेवर जोरदार टीका केली आहे. परंतु याप्रकरणावर शिवसेनेने अद्याप कोणतेही भूमिका घेतलेली नाही.