शरद पवारांच्या नाराजीवर वनमंत्री राठोडांनी दिली प्रतिक्रिया, म्हणाले….

मुंबईः पोलीसनामा ऑनलाईन – पूजा चव्हाण आत्महत्या प्रकरणी आरोप झाल्यानंतर गेल्या 15 दिवसांपासून बेपत्ता असलेल्या वनमंत्री संजय राठोड यांनी मंगळवारी (दि. 23) पोहरादेवी येथे सर्वांसमोर येत जोरदार शक्तीप्रदर्शन केले. मात्र शक्तिप्रदर्शनामुळे महाविकास आघाडीतील ज्येष्ठ नेते शरद पवार हे नाराज झाल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरु आहे. दरम्यान, पवारांच्या नाराजीवर राठोड यांनी प्रतिक्रिया दिली आहे. ते म्हणाले की, शरद पवार यांच्या नाराजीबाबत मला काही बोलायचे नाही. मी जे काही बोलायच होत ते काल बोललो आहे. काल सांगितल्याप्रमाणे आजपासून मी माझ्या शासकीय कामांना सुरुवात करणार असून आता मी मंत्रिमंडळाच्या बैठकीसाठी मुंबईत जात आहे.

दरम्यान राठोड यांच्या समस्यांमध्ये आणखी वाढ होण्याची चिन्हे दिसत आहेत. राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार राठोड यांच्यावर नाराज असल्याचे समजते. पवारांनी मंगळवारी (दि. 23) मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची वर्षा निवासस्थानी जाऊन भेट घेऊन राठोड यांच्याबद्दल स्पष्ट शब्दांत नाराजी व्यक्त केली आहे. राठोड यांच्यावरील आरोप अतिशय गंभीर स्वरुपाचे आहेत. त्यामुळे पोलीस तपास पूर्ण होईपर्यंत त्यांनी मंत्रिपदापासून दूर व्हावे. राठोड यांच्यावरील आरोपांचा परिणाम मुख्यमंत्री आणि महाविकास आघाडी सरकारच्या प्रतिमेवर होत असल्याचे पवार यांनी मुख्यमंत्री ठाकरे यांना सांगितले आहे.