मुख्यमंत्री उध्दव ठाकरेंकडून संजय राठोडांची ‘ती’ विनंती अमान्य

पोलीसनामा ऑनलाइन टीम –  पूजा चव्हाण आत्महत्या प्रकरणात अनेक कथित ऑडिओ क्लिप व्हायरल झाल्या. या ऑडिओ क्लिपमुळे मंत्री संजय राठोड यांच्या अडचणीत भर पडली, संजय राठोड हे पूजाच्या मृत्यूसाठी जबाबदार आहेत असा आरोप विरोधकांनी केला, तसेच या प्रकरणाची सखोल चौकशी करण्याची मागणीही केली.

एकीकडे विरोधकांचा वाढता दबाव आणि दुसरीकडे संजय राठोड यांचे पूजाच्या मृत्यूनंतर १५ दिवस मौन बाळगणं, त्यामुळे या प्रकरणाने ठाकरे सरकारभोवती संशयाचं वातावरण निर्माण झालं, संजय राठोड यांनी पोहरादेवी गडावर शक्तिप्रदर्शन करून मुख्यमंत्र्यांच्याच आदेशाला केराची टोपली दाखवली.

पूजा चव्हाण आत्महत्या प्रकरणात(Pooja Chavan Suicide Case) अडचणीत आलेल्या शिवसेना नेते संजय राठोड(Sanjay Rathod) यांच्यावर राजीनामा देण्याची वेळ आली, या प्रकरणाच्या निमित्ताने विरोधकांनी ठाकरे सरकारवर दबाव वाढवला आणि राठोड यांचा राजीनामा घेत नाही तोवर अधिवेशन चालू देणार नाही अशी भूमिका घेतली, त्यातच अधिवेशनाच्या एक दिवस आधीच राठोडांनी वर्षावर जाऊन मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंकडे राजीनामा सोपवला. पोहरादेवी गडावरील शक्तिप्रदर्शन, पूजा चव्हाण आत्महत्या प्रकरणात संजय राठोड यांचे नाव येणे, या सगळ्या गोष्टींमुळे विरोधकांना सरकारवर टीका करण्याची आयती संधीच सापडली, त्यामुळे अधिवेशनाच्या पूर्वसंध्येला राठोड यांचा राजीनामा घेऊन त्यांनी नैतिकतेच्या आधारे हा राजीनामा दिल्याचं मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंकडून स्पष्ट करण्यात आलं.

गेल्या ५ दिवसांपासून संजय राठोड यांचा राजीनामा मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंकडे होता, त्यांनी तो राजीनामा राज्यपालांकडे पाठवला नाही अशा बातम्या माध्यमात आल्यानंतर आता उद्धव ठाकरेंनी हा राजीनामा मंजूर केल्याची माहिती आहे, या राजीनाम्यावर उद्धव ठाकरेंची स्वाक्षरी झाली असून लवकरच तो राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्याकडे पाठवण्यात येईल. पूजा चव्हाण प्रकरणात अडचणीत आलेल्या संजय राठोड यांनी आपल्यावरील कारवाई टाळावी म्हणून अनेक प्रयत्न केले, यात पोहरादेवी गडावर हजारोंच्या उपस्थितीत त्यांनी या प्रकरणावर पहिल्यांदाच भाष्य केले, पूजा चव्हाणशी माझा कोणताही संबंध नाही, चौकशीत सत्य बाहेर येईल इतकचं त्यांनी सांगितले, या गर्दीच्या निमित्ताने एकप्रकारे शिवसेना नेतृत्वावर दबाव निर्माण करण्याचा प्रयत्न केला होता असं राजकीय विश्लेषक सांगतात. तर शेवटपर्यंत राजीनामा घेऊ नये यासाठी संजय राठोड यांनी एकदा पोहरादेवी गडावरच्या मंहतांशी बोला, अशी विनवणी राठोड यांनी मुख्यमंत्र्यांना केली, इतकचं नाही तर चौकशी होत नाही तोपर्यंत राजीनामा स्वीकारू नये असंही विनंती संजय राठोड यांनी केली होती, मात्र ती विनंती फेटाळत अखेर हा राजीनामा मुख्यमंत्र्यांकडून मंजूर करण्यात आला आहे.

दरम्यान, पूजा चव्हाण आत्महत्या प्रकरणात शिवसेनेच्या बीड महिला जिल्हाप्रमुख संगिता चव्हाण यांनी भाजपा नेत्यांविरोधात तक्रार दिली आहे. या तक्रारीत पूजाच्या बंद फ्लॅटमध्ये घरफोडी करून काही मौल्यवान वस्तू, लॅपटॉप आणि मोबाईल चोरून मनाला वाटेल तसे काही फोटो, ऑडिओ क्लिप, व्हिडीओ छेडछाड करून सोशल मीडियात जाणुनबुजून पसरवले जात आहेत असा आरोप भाजपा नेत्यांवर केला आहे. विधिमंडळ अधिवेशनाच्या एक दिवस आधी म्हणजे २८ फेब्रुवारीला संजय राठोड यांनी पूजा चव्हाण आत्महत्येबाबत झालेल्याआरोपांच्या पार्श्वभूमीवर राजीनामा दिला होता. मुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानी ते सपत्नीक गेले होते आणि त्यांनी राजीनाम्याचे पत्र दिले होते. हा राजीनामा आपण स्वीकारला असल्याची माहिती त्याच दिवशी सायंकाळी मुख्यमंत्र्यांनी पत्रकारांना दिली होती. संजय राठोड यांच्या राजीनाम्यामुळे अधिवेशनाचे कामकाज सोमवारपासून सुरळीत झाले. मात्र, राठोड हे कागदोपत्री अजूनही मंत्री आहेत. कारण, मुख्यमंत्र्यांनी त्यांचा राजीनामा राजभवनकडे अद्याप पाठविलेला नाही अशा बातम्या माध्यमांमध्ये झळकल्या, त्यानंतर आता या राजीनाम्यावर पुढील कारवाई करण्यात आली आहे.