Pooja Chavan Suicide Case : अरुण राठोडला पोलिसांनी खरंच ताब्यात घेतलंय का ? जाणून घ्या सत्य

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – पूजा चव्हाण आत्महत्या प्रकरणी अरुण राठोड या तरूणाचं नावही प्रखरतेनं पुढं येताना दिसत आहे. अशात पुणे पोलिसांनी त्याला ताब्यात घेतलं असून त्याची चौकशी सुरू केली जात असल्याची माहिती समोर येताना दिसली. याबाबत वानवडी पोलीस ठाण्यात विचारणा केली असता, पूजा चव्हाण प्रकरणी अद्याप कुणालाही ताब्यात घेतलं नसल्याचं संबंधित विभागाच्या पोलीस उपायुक्त नम्रता पाटील यांनी सांगितलं आहे.

पुण्यातील ज्या वानवडी पोलीस ठाण्यात पूजा चव्हाणच्या मृत्यूची नोंद झाली आहे त्या पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक दीपक लगड यांनीही या प्रकरणी अद्याप कुणालाही ताब्या घेतलं नाही असं सांगितलं आहे. बुधवारी देखील नम्रता पाटील आणि दीपक लगड या अधिकाऱ्यांनी कुणाला ताब्यात घेतलेलं नाही अशीच माहिती दिली होती.

पूजा चव्हाण आत्महत्या प्रकरणी भाजपनं आरोप केला होता की, मंत्री संजय राठोड यांच्या सोबत असलेल्या प्रेमसंबंधातून तिनं हे पाऊल उचललं आहे. या प्रकरणी भाजपकडून पुरावा म्हणून काही ऑडिओ क्लीप्सही देण्यात आल्या आहेत. संजय राठोड आणि अरुण यांच्यात झालेल्या संवादाच्या या क्लीप्स असल्याचं सांगितलं जात आहे. दरम्यान यातील आवाज कोणाचा आहे याचा तपास सध्या सुरू आहे. या प्रकरणी अरुण राठोड या तरूणाचं नावही प्रखरतेनं पुढं येताना दिसत आहे.

पूजा चव्हाण प्रकरणाचं गूढ अधिकच वाढलं
यवतमाळच्या वसंतराव नाईक शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात पूजा अरूण राठोड नावाच्या मुलीचा गर्भपात झाल्याची नोंद आहे. ही पूजा अरूण राठोड हीच पूजा चव्हाण आहे का यबाबत कुठलीही माहिती दिली गेली नाही. पूजा अरूण राठोड नावाची महिला 6 फेब्रुवारी रोजी पहाटे 4 वाजून 34 मिनिटांनी या वैद्यकीय महाविद्यालयात दाखल झाली होती. अहवालात याबाबत नोंद आहे. तिचा वॉर्ड नंबर 3 होता. डॉ. श्रीकांत वराडे यांनी तिच्यावर उपचार केल्याचं रिपोर्टमध्ये दिसत आहे. या सगळ्यानंतर आता या प्रकरणाचं गूढ अधिकच वाढलं आहे.

सोशलवर व्हायरल झालेल्या शॉर्ट केस रिपोर्टमध्ये रुग्णाचं नाव पूजा अरूण राठोड (22) असून तिच्यावर जननी शिशु सुरक्षा योजनेंतर्गत उपचार करण्यात आले. पहाटे 4.34 मिनिटांनी तिला युनिट 2 मध्ये वॉर्ड क्रमांक 3 मध्ये दाखल करण्यात आलं. या रिपोर्टवर युनिट 2 चे प्रमुख डॉ. श्रीकांत वराडे यांचं नाव नमूद करण्यात आलं आहे.