पूजा चव्हाण आत्महत्या प्रकरण : मंत्री संजय राठोड आणखी ‘गोत्यात’ ?

मुंबई : पोलिसनामा ऑनलाईन – पूजा चव्हाण आत्महत्याप्रकरणात नवनवीन माहिती सोमर येत असून शिवसेना नेते आणि राज्याचे वनमंत्री संजय राठोड चांगलेच अडचणीत सापडले आहेत. या प्रकरणावरून विरोधकांनी सरकारची चांगलीच कोंडी केली असून राठोड यांच्या राजीनाम्यासाठी सरकारवर दबाव आणला आहे. दरम्यान, राजय राठोड हे गुरुवारी राजीनामा देणार असल्याची माहिती समोर आली आहे.

पूजा चव्हाण या तरुणीच्या आत्महत्येची घटना समोर आल्यानंतर सोशल मीडियावर १२ कथित ऑडिओ क्लिप व्हयरला झाल्या. यामध्ये समभाषण करणाऱ्या व्यक्तीचा आवाज हा वनमंत्री संजय राठोड यांचा असल्याचा संशय व्यक्त करण्यात आला. त्यानंतर संजय राठोड नॉट रिचेबल होते. भाजपकडून या प्रकरणावर संजय राठोड यांना घेरण्याचा प्रयत्न सुरू झाला. दरम्यान, संजय राठोड हे थेटपणे समोर आलेले नाहीत. त्यांचा राजीनामा घ्यावा यासाठी विरोधकांनी दबाव वाढवला होता. तसेच, शिवसेनेमधील एक गटही त्यांच्या राजीनाम्यासाठी आग्रही आहे. पक्ष किंवा सरकार अडचणीत येत असेल तर राजीनामा घेऊन ठेवावा असाही एक मतप्रवाह पक्षात पाहायला मिळत आहे. त्यामुळे आता संजय राठोड हे मंत्रिपदाचा राजीनामा देणार असल्याची चर्चा आहे. पोहरादेवी येथून संजय राठोड हे गुरुवारी राजीनाम्याची घोषणा करणार असल्याची शक्यता आहे. बंजारा समाजाची आणि पूजा चव्हाणच्या कुटुंबियांनी संजय राठोड यांना क्लिन चीट दिली आहे. त्यामुळे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे देखील द्वीधा मनःस्थितीत असल्याचे दिसून येत आहे.

दुसरीकडे संजय राठोड यांच्या मागे शिवसेनेतील एक वरिष्ठ नेते आणि कॅबिनेट मंत्री खंबीरपणे उभे असल्याचे सांगण्यात येत आहे. तसेच धनंजय मुंडे प्रकरणात राजीनामा घेतला नाही. मग संजय राठोड यांनी तरी का द्यावा राजीनामा? असं जर झालं तर विरोधक वेगवेगळ्या मुद्यांवर राजीनामे मागत सुटतील असाही एक प्रवाह शिवसेनेत आहे.

ऑडिओ क्लिपमधील आवाज पूजा चव्हाणचा नाही
पूजाचे वडील लहू चव्हाण म्हणाले, सोशल मीडियावर ज्या ऑडिओ क्लिप व्हायरल होत आहेत. त्यातील आवाज पूजाचा नाही. पूजाच्या मृत्यूप्रकरणी आपली कोणाविरोधातही तक्रार नाही, कुणाविषयी शंका नाही. त्यामुळे आमची आणि समाजाची बदनामी करून आम्हाला वेदना देऊ नका, अशी विनंती त्यांनी केली आहे. या प्रकरणात मंत्री संजय राठोड यांचे नाव जोडले गेले मात्र ते पूजाच्या वडिलांसारखे आहेत, असेही लहू चव्हाण यांनी सांगितले.

मोबाईल, लॅपटॉपमध्ये अनेक आक्षेपार्ह गोष्टी
पूजा चव्हाण आत्महत्याप्रकरणी भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनीही प्रतिक्रिया दिली आहे. ते म्हणाले, आत्महत्या केलेल्या मुलीचा लॅपटॉप आणि मोबाईल पोलिसांनी जप्त केला आहे. त्यामध्ये अनेक आक्षेपार्ह माहिती सापडली आहे. पोलिसांनी तिचा मोबाईल आणि लॅपटॉपमध्ये काय आहे हे जाहीर करावे, नाहीतर दोन-तीन दिवसांत याची माहिती बाहेर येईलच असा इशाराही त्यांनी दिला.

कोण आहे पूजा चव्हाण?
बीड जिल्ह्यातील परळीत पूजा चव्हाण शिक्षणासाठी महिन्यापूर्वीच पुण्यात आली होती. पूजाचे आई- वडील परळीत राहतात. तिच्या ५ बहिणींपैकी ४ बहिणींची लग्न झाली आहे. पूजा कुटुंबाला मुलासारखी होती. साेशल मीडियावर तिचे लाखो चाहते होते. १ महिन्यापूर्वी पूजा पुण्यात स्पोकन इंग्लिशच्या क्लासेससाठी आली होती. पुण्यात ती भाऊ विलास चव्हाण व मित्र अरुण राठोड यांच्या सोबत भाड्याच्या सदनिकेमध्ये राहत होती.