मुंबईतील गुन्हेगारीवर ‘प्रजा’ फाऊंडेशनचा खळबळजनक अहवाल

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन – मुंबईतील लोकसंख्या वाढत आहेच तसा तेथील कायदा सुव्यवस्थेचा प्रश्नही वाढत आहे. मुंबईतील कायदा सुव्यवस्थेवर प्रश्नचिन्ह उभा झाला आहे. कारण प्रजा फाऊंडेशनने मुंबईतील गुन्हेगारीवर खळबळजनक अहवाल प्रसिद्ध केला आहे. मागील काही वर्षात मुंबईत दंगली, बलात्कार आणि विनयभंगसारख्या गंभीर घटनांमध्ये वाढ झाली आहे. प्रजा फाऊंडेशनच्या या अहवालात याबद्दल खळबळजनक खुलासा केला आहे.

प्रजाने दिलेल्या अहवालानुसार २०१३-१४ ते २०१७-१८ सालाच्या अहवालात बलात्कार, विनयभंग आणि दंगलींसारख्या गुन्ह्यात अनुक्रमे ८३%, ९५%, ३६% ने वाढ झाली आहे.  तर २०१७-१८ या वर्षात लैंगिक गुन्ह्यांपासून ते बालक संरक्षण अधिनियम (पोस्को) या कायद्याअंतर्गत गुन्ह्यांमध्ये १९ % वाढ झाली. २०१५-१६ वर्षात पोस्को कायद्यांतर्गत एकूण ८९१ गुन्हे दाखल झाले आहेत.

तसंच ३२% लोकांना कायदा सुव्यवस्थेवर विश्वासच नाहीय, ही धक्कादायक माहिती समोर आली. यामुळे अधिक तर लोक आपल्यासोबत घडलेल्या गुन्ह्याची बाबत पोलीसांना माहितीच दिलेली नाही. तसंच २३ % लोकांच्या मते तर पोलीस अधिकाऱ्यांशी बोलणे म्हणजे वेदनादायक असते. तर पोलिसांच्या चक्रात अडकू नये म्हणून गुन्ह्याची माहितीही लोक पोलीसांना देत नाहीत, अशी माहिती पोलीसांनी दिलेल्या माहितीतून उघड झाली आहे. तर जुलै २०१८ पर्यंत मुंबई पोलीस दलात २२% कर्मचाऱ्यांची कमतरता आहे, अशीही माहिती समोर आली.

दरम्यान, मुंबईतील वाढत चाललेल्या गुन्हेगारीवर तेथील लोकप्रतिनीधींनी आवाज उठवला आहे, याचाही अहवाल प्रजा फाऊंडेशनने दिला आहे. २०१७-१८ मधील अधिवेशनांमध्ये बलात्कार विषयावर दक्षिण मुंबईच्या फक्त ५, ईशान्य मुंबईच्या २ आमदारांनी, तर उत्तर मुंबईच्या २ आमदारांनी, प्रश्न विचारले आहेत. त्यामुळे ही चिंताजनक बाब आहे. त्यामुळे याचा पोलिस यंत्रणेसह राज्याच्या गृहविभागाला गांभिर्याने विचार करणे गरजेचे आहे.