प्रमोद जठारांनी दिलेला राजीनामा मुख्यमंत्र्यांनी फाडला आणि…

सावंतवाडी : पोलीसनामा ऑनलाईन – भाजपाचे माजी आमदार आणि जिल्हाध्यक्ष प्रमोद जठार यांनी आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे पदाचा राजीनामा दिला. मात्र मुख्यमंत्र्यांनी तो राजीनामा न स्वीकारता फाडून टाकला. यानंतर मुख्यमंत्र्यांनी त्यांची मनधरणी करण्याचाही प्रयत्न केला. नाणार प्रकल्प रद्द केल्याच्या कारणावरून त्यांनी पदाचा राजीनामा दिला होता.

प्रमोद जठार यांनी कालच जिल्हाध्यक्षपदाचा राजीनामा देणार असल्याची घोषणा केली होती. यावेळी बोलताना त्यांनी रोजागाराचा प्रश्न उपस्थित केला होता. नाणार प्रकल्प राजकीय भांडणामुळे रद्द झाला. परंतु यामुळे मात्र कोकणचे पुढील पन्नास वर्षांचे नुकसान झाले. कोकणवासियांनी आपल्या जमिनी विकास कामांना दिल्या त्याचा फायदा जगाला झाला परंतु कोकणात रोजगार निर्माण झाला नाही अशी खंतही त्यांनी व्यक्ती केली.

चिपी विमानतळाच्या उद्घाटनासाठी आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस सिंधुदूर्गमध्ये आले होते. यावेळी आज दुपारी जठार यांनी आपल्या पदाचा राजीनामा मुख्यमंत्र्यांच्या हाती दिला. यानंतर मुख्यमंत्र्यांनी तो राजीनामा नाकारत तो राजीनामा फाडून टाकला. यानंतर तो राजीनामा मुख्यमंत्र्यांनी एके काळी कट्टर राणे समर्थक म्हणून ओळखल्या जाणाऱ्या भाजपाचे नेते राजन तेली यांच्या खिशात टाकला. त्यांनी केलेली कृती पाहून सर्वांना कोडे पडले की त्यांनी राजीनामा तेलींच्या खिशात का टाकला असावा ?

यानंतर मुख्यमंत्र्यांनी प्रमोद जठार यांची नाराजी दूर करण्याचे प्रयत्न केले. इतकेच नाही तर, तुमचे रोजगार उपलब्ध करण्याचे स्वप्नही आम्ही पूर्ण करू असे आश्वासनही मुख्यमंत्र्यांनी जठार यांना दिले.

दरम्यान सोमवारी झालेल्या पत्रकार परिषदेत बोलताना प्रमोद जठार म्हणाले होते की, “पर्यावरणाची हानी, प्रदूषण आदी कारणांमुळे प्रकल्प रद्द झाला असता तर ते आम्ही समजू शकलो असतो. त्यासाठी लोकप्रतिनिधी, पत्रकार, स्थानिक ग्रामस्थ यांना घेऊन रिफायनरी कंपनीने पानीपत दौरा केला. तेथील रिफायनरी दाखवली. तेव्हा कोणतेही प्रदूषण अथवा निसर्गाची हानी झाली नसल्याचे लक्षात आले. परंतु याबाबतची कोणतीही माहिती न घेता शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी नाणार प्रकल्पाला विरोध केला हे चुकीचे आहे.” पुढे बोलताना, प्रबोधनकार ठाकरे यांच्या नातवाकडून ही अपेक्षा नव्हती असेही जठार म्हणाले. याचवेळी त्यांनी असेही जाहीर केले होते की, चिपी विमानतळाच्या उद्घाटनासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस सिंधुदुर्गात येत आहेत. त्याचवेळी आपण जिल्हाध्यक्षपदाचा राजीनामा देणार आहोत.