माडगूळकर यांना राष्ट्रपती पोलिस पदक जाहीर

पिंपरी : पोलिसनामा ऑनलाइन – पोलीस दलातील उत्कृष्ट सेवेबद्द्ल पिंपरी चिंचवड पोलिस आयुक्तालयातील सहायक पोलीस आयुक्त गणपतराव सदाशिव माडगूळकर यांना आज राष्ट्रपती पोलिस पदक जाहीर झाले आहे.

पिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्तालयातील देहूरोड विभागाचे सहायक पोलीस आयुक्त असणारे हे १९८५ मध्ये पोलीस दलात दाखल झाले. ते गेले ३३ वर्षे पोलीस दलात कार्यरत असून, त्यांनी मुंबईमधील विविध पोलीस ठाण्यांत १६ वर्षे सेवा केली. वसई, ठाणे, नालासोपारा परिसरामध्ये काम केले. ते २००९ मध्ये हिंजवडी पोलीस ठाण्यात वरिष्ठ पोलीस निरीक्षक या पदावर रुजू झाले. त्यांनी तिथे साडेतीन वर्षे काम पाहिले. त्यांनी डांगे चौकामध्ये झालेल्या तिहेरी खून खटल्याचा तपास तातडीने केला होता.

हिंजवडी परिसरातील गुन्हेगारीला सक्षमपणे लगाम लावला होता. गुन्हे अन्वेषण विभाग, पुणे शहर गुंडा स्काँडमध्येही काम केले आहे. केंद्रीय गुन्हे अन्वेषण विभागात काम केले आहे.

१९८८ मध्ये मुंबई विमानतळावर सेवेत असताना त्यांनी कस्टमच्या नजरेतून सुटलेले कोट्यवधींचे ‘मॅनड्रक्स’ हे ड्रग्स पकडून संबधितावर कारवाई केली होती. त्या वेळी पोलीस महासंचालकांनी त्यांचे अभिनंदन करून सन्मान केला होता. २०१५ मध्ये चांगल्या सेवेबद्दल त्यांना पोलीस महासंचालक पदकाने पालकमंत्री गिरीश बापट यांच्या हस्ते सन्मानित करण्यात आले. आत्तापर्यंतच्या सेवेमध्ये त्यांना एकूण सुमारे २३५ बक्षिसे मिळाली आहेत. अनेक गुन्ह्यांचा त्यांनी छडा लावला आहे.