जगातील सर्वात मोठ्या स्टेडियमचे नाव बदलले; ‘मोटेरा’वरून झाले ‘नरेंद्र मोदी स्टेडियम’

अहमदाबाद : जगातील सर्वात मोठे स्टेडियम अशी ओळख असलेल्या गुजरातच्या अहमदाबाद येथील मोटेरा क्रिकेट स्टेडियमचे नाव आता बदलण्यात आले आहे. या स्टेडियमचे नाव नरेंद्र मोदी स्टेडियम ठेवण्यात आले आहे. या स्टेडियमचे उद्घाटन राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी आज केले. त्यांच्यासोबत अनेक मंत्र्यांची उपस्थिती होती.

या कार्यक्रमात केंद्रीय गृहमंत्री अमित शहा, क्रीडामंत्री किरेन रिजीजू आणि गुजरातचे उपमुख्यमंत्री नितीन पटेल हे देखील उपस्थित होते. नव्या सुविधा आणि सजावटीसह सुरु होणाऱ्या स्टेडियममध्ये भारत आणि इंग्लंडचे सीरिजची तिसरी टेस्ट मॅच खेळली जाणार आहे. दोन दिवसांच्या दौऱ्यावर गुजरात येथे आलेल्या राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी पत्नीसह सरदार वल्लभाई पटेल स्पोर्ट्स एन्क्लेव्हचे भूमिपूजन केले.

भारत आणि इंग्लंड या देशांदरम्यान तिसरी टेस्ट मॅच 24 फेब्रुवारी म्हणजे आजपासून अहमदाबादच्या नवनिर्मित मोटेरा क्रिकेट स्टेडियममध्ये सुरु होणार आहे. ही डे-नाईट मॅच असेल. नवीन स्टेडियम बनवल्यानंतर ही पहिली टेस्ट मॅच खेळली जात आहे. भारत आणि इंग्लंडमध्ये शेवटची चौथी टेस्ट मॅचही याच स्टेडियममध्ये खेळली जाणार आहे.

दरम्यान, गेल्या वर्षी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि अमेरिकेचे तत्कालीन राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचा मोटेरा स्टेडियममध्ये संयुक्त कार्यक्रम झाला होता. त्यामध्ये त्यांनी उपस्थितांना संबोधित केले होते.

63 एकरवर स्टेडियम

अहमदाबाद येथील स्टेडियम 63 एकरवर पसरला आहे. आत्तापर्यंत मेलबॉर्न सर्वात मोठे स्टेडियम होते. या स्टेडियममध्ये 90 हजार लोक बसण्याची क्षमता आहे. पण आता मोटेराची ओळख होईल. जगातील सर्वात मोठा पुतळा ‘स्टॅच्यू ऑफ युनिटी’नंतर गुजरातला जगातील सर्वात मोठे स्टेडियम मिळाले आहे.