पंतप्रधान नरेंद्र मोदींची भारतीय अर्थव्यवस्थेबाबत मोठी भविष्यवाणी

सियोल : वृत्तसंस्था – पंतप्रधान नरेंद्र मोदी दोन दिवसांच्या परदेश दौऱ्यावर असून आज ते दक्षिण कोरियाच्या राजधानी सियोलमध्ये पोहोचले आहेत. यावेळी त्यांनी भारतीय अर्थव्यवस्थेविषयी मोठी भविष्यवाणी केली आहे.

दक्षिण कोरियाच्या उद्योजकांना भारतातील गुंतवणुकीच्या संधी सांगताना मोदी म्हणाले की,’ भारताची अर्थव्यवस्था मजबूत असून हा देश संधी निर्माण करणारा देश आहे.जगातील कोणतीही अर्थव्यवस्था दरवर्षी ७ टक्क्यांनी वाढलेली नाही. ह्युंदाई, सॅमसंग आणि एलजी इलेक्ट्रॉनिक्ससह ६०० पेक्षा अधिक कोरियाई कंपन्यांनी भारतात गुंतवणूक केली आहे. आम्ही अन्य कंपन्यांनाही गुंतवणूक करण्यासाठी निमंत्रण देत आहोत. आमची अर्थव्यवस्था मजबूत आहे. लवकरच देशाची अर्थव्यवस्था ५ लाख कोटी डॉलर होणार आहे. त्यादिशेने तयारीही सुरु आहे, असे मोदी यांनी सांगितले.

लोकशाहीचा मित्र म्‍हणुन भारत आणि दक्षिण कोरिया विश्वशांतीच्या दृष्‍टीकोनातून एकत्र आहेत. अर्थव्यवस्‍थेच्या साथीदाराच्या स्‍वरुपात आपली ताकद आणि गरजा एकमेकाला पुरक आहेत. तसेच दक्षिण कोरिया हा मेक इन इंडिया, स्‍वच्‍छ भारत आणि स्‍टार्ट अप इंडियामध्येही महत्‍वपूर्ण भागीदार आहे. देशात वस्तू आणि सेवा कर म्हणजेच जीएसटी लागू केल्याने अर्थव्यवस्थेला मिळालेली गती आणि धोरणात्मक निर्णयांमुळे एफडीआय गुंतवणूक मोठ्या प्रमाणावर आली आहे. यामुळे भारत जागतिक बँकेच्या सुलभता यादीमध्ये ६५ अंकानी वधारून ७७ व्या स्थानावर आला आहे, असे ही मोदी म्हणाले.

पंतप्रधान नरेंद्र मोदी दक्षिण कोरिया दौर्‍यावर आहेत. लोकांनी हातात तिरंगा फडकावत मोदींचे मोठ्या उत्‍साहात स्‍वागत केले. यावेळी पंतप्रधान मोदी यांनी भारतीय समुदायाच्या सदस्‍यांसोबत चर्चा केली. सियोलच्या विमानतळावर पंतप्रधान मोदींच्या सन्मानार्थ गार्ड ऑफ ऑनरही देण्यात आला. तसेच पंतप्रधान मोदी यांना २२ फेब्रुवारीला सियोल शांती सन्मान प्रदान करण्यात येणार आहे.