पंतप्रधान नरेंद्र मोदींचा मालदीव दौरा ; मोदींकडून मालदीवच्या राष्ट्रपतींना ‘बॅट’ भेट

माले : वृत्तसंस्था – पंतप्रधान नरेंद्र मोदी आजपासून मालदीवच्या दौऱ्यावर आहेत. तिथे त्यांना ‘निशाण इज्जुद्दीन’ हा सन्मान देण्यात आला आहे. हा परदेशी प्रतिनिधींना देण्यात येणारा मालदीवचा सर्वात मोठा नागरी सन्मान आहे. राष्ट्रपती इब्राहिम मोहम्मद सोलिह यांच्या हस्ते हा पुरस्कार नरेंद्र मोदी यांना देण्यात आला. या नंतर नरेंद्र मोदी यांनी मालदिवचे राष्ट्रपती इब्राहिम मोहम्मद सोलिह यांना भारतीय क्रिकेट संघाच्या खेळाडूंनी सही केलेली बॅट भेट दिली आहे. नरेंद्र मोदी यांनी स्वतः ट्विट करून ही माहिती दिली.

मोदी यांनी ट्विटमध्ये म्हंटले की, माझे मित्र राष्ट्रपती इब्राहिम मोहम्मद सोलिह क्रिकेटचे जबरदस्त चाहते आहेत. त्यामुळे मी त्यांना भारतीय क्रिकेट संघाच्या खेळाडूंनी सही केलेली बॅट भेट देत आहे. बॅटवर क्रिकेट वर्ल्ड कप २०१९ असे देखील लिहिले आहे.

मालदीवचे क्रिकेट विकसित करण्यासाठी भारताकडून आशा
मालदीवचे खेळ मंत्री अहमद महलूफ यांनी मालदीवच्या क्रिकेटचे बीसीसीआयने पालकत्व घेण्याची मागणी केली आहे. महलुफ यांनी म्हंटले की, ज्या पद्धतीने बीसीसीआयने अफगाणिस्तान क्रिकेट बोर्डाचे पालकत्व स्वीकारले होते, अगदी त्याच प्रकारे बीसीसीआयने आमच्या क्रिकेट क्षेत्रासाठी मदत करावी. त्यांनी म्हंटले की खेळ आणि तांत्रिक मदतीसाठी आम्ही लोक एका रणनीतीवर काम करू इच्छितो. खेळासाठी आम्हाला भारताकडून खूप मदत मिळाली आहे. आमची बीसीसीआयसोबत यशस्वी संवाद झाला आहे. आम्हाला आशा आहे की क्रिकेटला विकसित करण्यासाठी आम्हाला बीसीसीआय मदत करेल.