पोलिसांना लागली डुलकी आणि दरोडेखोराने दिली हुलकावणी

नागपूर : पोलीसनामा ऑनलाईन – कुख्यात दरोडेखोराला नाशिकच्या न्यायालयात हजर करण्यासाठी नेत असताना रेल्वेतून उडी मारुन फरार झाला. आरोपी फरार झाला त्यावेळी पोलीस झोपेत होते. याचा फायदा घेऊन कुख्यात दरोडेखोर सतीश उर्फ छोट्या जैनू काळे (वय-३५) याने रेल्वेतून उडी घेऊन फरार झाला. काळे हा तळोजा कारागृहात जन्मठेपेची शिक्षा भोगत होता.

सतीश काळे (रा. बिलौनी, ता. वैजापूर, जि. औरंगाबाद) हा कुख्यात दरोडेखोर असून त्याने टोळी बनवून अनेक ठिकाणी गुन्हे केले आहेत. दरोडा टाकताना शस्त्रासह हल्ला करून जीवे मारण्याचा प्रयत्न लुटमार करण्यात तो पटाईत आहे. त्याला एका सशस्त्र दरोडा आणि प्राणघातक हल्ला केल्या प्रकरणी त्याला जन्मठेपेची शिक्षा सुनावण्यात आली होती. तो तळोजा कारागृहात शिक्षा भोगत होता. २०१७ मध्ये त्याला नागपूर मध्यवर्ती कारागृहात उर्वरित शिक्षा भोगण्यासाठी पाठविण्यात आले होते.

नाशिक येथे सुरू असलेल्या दुसऱ्या केसच्या सुनावणी करिता त्याला न्यायालयात हजर करण्यासाठी नागपूर पोलिसांचे पथक २६ नोव्हेंबर रोजी सेवाग्राम एक्‍सप्रेसने घेऊन जात होते. २८ नोव्हेंबर रोजी पहाटे ३ वाजताच्या सुमारास जळगाव जिल्ह्यातील बोदवड रेल्वे स्टेशनवर त्याने पोलिसांना गुंगारा देऊन पळून गेला.त्याचा शोध घेण्यात येत असून तो अद्यापही मिळाला नाही. या प्रकरणाची माहिती मध्यवर्ती कारागृह प्रशासनाला देण्यात आली असून कैदी सतीश काळेच्या शोधासाठी नागपूर आणि जळगाव पोलिसांनी पथके तयार केली आहे. बोधवडच्या आसपासच्या परिसरात पोलिसांनी कैद्याचे फोटो दाखवून शोध सुरू केला आहे.