मोदी सरकार कोरोना लसीकरणाबाबत महत्त्वाचा निर्णय घेण्याच्या तयारीत

नवी दिल्ली:  गेल्या काही दिवसांपासून देशातील कोरोना रुग्णांची संख्या पुन्हा वाढत आहे. महाराष्ट्र, केरळ, छत्तीसगड, पंजाब आणि मध्य प्रदेशात पुन्हा कोरोनाचा कहर दिसून येत आहे. या पार्श्वभूमीवर गृहमंत्री अमित शहांनी आरोग्य मंत्रालयाला कोरोना लसीकरणाचा वेग वाढवण्याच्या सूचना दिल्या आहेत. देशात सध्या आरोग्य कर्मचारी आणि फ्रंटलाईन वर्कर्सना लस दिली जात आहे. मात्र आता केंद्र सरकार 50 वर्षांवरील व्यक्तींच्या लसीकरणासाठी पाऊल टाकणार आहे.

देशातील 50 वर्षांवरील व्यक्तींची संख्या 27 कोटींच्या घरात आहे. या व्यक्तींना लवकर लस मिळावी यासाठी केंद्र सरकार खासगी क्षेत्राची मदत घेणार आहे. ज्येष्ठांना कोरोनाचा अधिक धोका असल्याने त्याचे लसीकरण प्राधान्याने पूर्ण केले जाणार आहे. खासगी क्षेत्राच्या मदतीमुळे कोरोना लसीकरणास गती येईल. कोरोना लसीकरणात खासगी क्षेत्राची भूमिका नेमकी काय असेल, त्याची सविस्तर माहिती पुढील काही दिवसांत उपलब्ध होईल, असे नीती आयोगाचे सदस्य डॉ. व्ही. के. पॉल यांनी यांनी सांगितले. एका उच्चपदस्थ सुत्राने दिलेल्या माहितीनुसार, पुढील टप्प्यात दररोज 50 हजार लोकांचे लसीकरणाची सरकारची योजना आहे. आतापर्यंत देशातल्या 1.07 कोटी आरोग्य कर्मचारी आणि फ्रंटलाईन वर्कर्सना कोरोना लस दिली आहे. पुढील टप्प्यात 40 ते 50 टक्के लसीकरण खासगी क्षेत्राच्या माध्यमातून केले जाईल. कोरोना लसीकरणाचा वेग वाढवण्याच्या सूचना केंद्राने राज्यांना केल्या आहेत.