मंदिराचे जतन व संवर्धनाची जबाबदारी आता एमएसआरडीसीकडे; 101 कोटीची तरतूद

मुंबई : पोलिसनामा ऑनलाईन – राज्य मंत्रिमंडळाच्या बुधवारच्या बैठकीत राज्यातील प्राचीन मंदिरांचे जतन आणि संवर्धन करण्याचा निर्णय घेण्यात आला. याकामी पुढील आर्थिक वर्षात त्यासाठी १०१ कोटी रुपयांची तरतूद करण्यात येणार आहे. विशेष म्हणजे  हे काम राज्य रस्ते विकास महामंडळामार्फत केले जाणार आहे. दरम्यान या प्रकल्पाचे स्वरूप काय असावे, प्राधान्याने कोणती कामे हातात घ्यावी, या कामांचा तपशिल कसा असावा, हे ठरविण्यासाठी शासकीय समिती नेमण्यास मंत्रिमंडळाने मान्यता दिली. सार्वजनिक बांधकाम विभागाचे अतिरिक्त मुख्य सचिव हे या समितीचे अध्यक्ष असतील.

साधारणत: इमारती, वास्तू बांधकाम हा विषय सार्वजनिक बांधकाम विभागाकडे येतो. काँग्रेसचे अशोक चव्हाण यांच्याकडे हा विभाग आहे. मात्र, मंदिरांचे जतन आणि संवर्धनाचे काम शिवसेनेकडे असलेल्या सार्वजनिक उपक्रम विभागांतर्गतच्या राज्य रस्ते विकास महामंडळामार्फत (एमएसआरडीसी) करण्यात येणार आहे.

सावित्रीबाई फुले महिला शिक्षण दिन
राज्यातील सर्व शाळांमध्ये क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांचा जन्मदिवस सावित्रीबाई फुले महिला शिक्षण दिन म्हणून साजरा करण्याचा निर्णय मंत्रिमंडळाने घेतला. तसेच या दिवशी त्यांच्या जीवनावर आधारित शाळांमध्ये भाषणे, निबंध, वक्तृत्व, परिसंवादाचे आयोजन करण्यात येईल.