Pune : महापालिका सेवकांवरील उपचारासाठी 100 बेडस् राखीव ठेवावेत; PMC एम्प्लॉईज युनियनची महापौरांकडे मागणी

पुणे – मागील वर्षभरापासून कोरोनाशी लढा देणारे महापालिका कर्मचारी, अधिकारी व त्यांचे कुटुंबिय मोठ्याप्रमाणावर बाधित होत आहेत. परंतू उपचारासाठी त्यांना ऑक्सीजन व बेड्ससाठी शोधाशोध करावी लागत आहे. या पार्श्‍वभूमीवर महापालिका प्रशासनाने किमान १०० बेड्सचे हॉस्पीटल महापालिका सेवकांवरील उपचारासाठी राखीव ठेवावे तसेच प्रत्येक रुग्णालयात किमान दोन व्हेंटीलेटर बेडस् राखीव ठेवावेत, अशी मागणी पी.एम.सी. एप्लॉईज युनियनच्यावतीने महापौरांकडे करण्यात आली आहे.

मार्च २०२० पासून महापालिकेची सर्व यंत्रणा कोरोना प्रतिबंधाच्या लढ्यात अहोरात्र काम करत आहे. आतापर्यंत महापालिकेचे १ हजार ४०० सेवक कोरोनामुळे बाधित झाले आहेत, तर ५५ जणांचा मृत्यू झाला आहे. सेवकांसोबतच त्यांच्या कुटुंबियांमध्येही कोरोना संसर्गाचे प्रमाण अधिक आहे. परंतू यानंतरही उपचारासाठी बेड मिळविण्यासाठी महापालिका सेवकांचीच दमछाक होत आहे. वेळेत बेड न मिळाल्यास गंभीर परिस्थिती निर्माण होत आहे. या पार्श्‍वभूमीवर महापालिकेने सेवक व त्यांच्या कुटुंबियांवरील उपचारासाठी १०० बेडस् उपलब्ध करून द्यावेत. सद्यस्थितीत सारसबाग येथील सणस स्पोर्टस ग्राउंडवरील विलगीकरण कक्षात ही व्यवस्था होउ शकते. तसेच अत्यावश्यक प्रसंगी महापालिकेच्या रुग्णालयांसह खाजगी रुग्णालयांतील अतिदक्षता विभागातील किमान दोन बेडस् राखीव ठेवावेत, अशी मागणी महापौर मुरलीधर मोहोळ यांना दिलेल्या निवेदनात करण्यात आली आहे. युनियनचे अध्यक्ष प्रदीप महाडीक आणि कार्याध्यक्ष आशिष चव्हाण यांनी हे निवेदन दिले.