Bank Fraud Case in Pune : एका निष्किय बँक खात्यात तब्बल 100 कोटी पडून, मास्टर माईंड अनघा मोडकची कसून चौकशी सुरु

पुणे : पोलीसनामा ऑनलाईन – बँकेतील निष्कीय खात्यांचा डेटा मिळवून त्याद्वारे अब्जावधीची फसवणूक करणा-या आंतरराज्य टोळीचा सायबर पोलिसांनी पर्दाफाश केल्यानंतर आता या कटाचे आणखी काही धागेदोरे पोलिसांच्या हाती लागले आहेत. यातील 5 खात्यांपैकी एका निष्किय खात्यात तब्बल 100 कोटी रुपये पडून असल्याची माहिती तपासात समोर आली आहे. अन्य बाकी चार खाती ही कार्पोरेट असून त्यात व्यवहार होत आहेत.

याप्रकरणी आतापर्यंत 11 आरोपींना पोलिसांनी अटक केली आहे. यातील मास्टर माईंड अनघा अनिल मोडक, तसेच राजेश शर्मा, परमजीत संधु (दोघे रा. औरंगाबाद) या तिघांना न्यायालयात हजर केले असता त्यांना 20 मार्चपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे. गुन्हे शाखेच्या पोलिसांनी औरंगाबाद, लातूर, वापी, हैदराबाद, पुणे आदी ठिकाणी आरोपींच्या घरी शोध मोहीम राबवली आहे. तसेच हैदराबाद आणि वापीतील संशयित आरोपींचा शोध सुरु आहे.

याबाबत पोलिसांनी न्यायालयात सांगितले की, अनघा मोडक ही या गुन्ह्यातील मुख्य सूत्रधार असून ती डेटा मिळविणे आणि विक्रीसाठी संबधितांपर्यंत पोहचविणे असे दलालीचे काम करीत असल्याने तिला सर्वांची माहिती आहे. त्यासाठी तिची पोलीस कोठडी आवश्यक आहे. राजेश शर्मा आणि परमजीतसिंग संधु यांनी मिळून डेटा विकत घेण्याकरीता कोणाकडून पैसे घेतले, ते कोणाला विक्री करणार होते, त्यांना खात्याचा डेटा कोणी दिला आदीचा आरोपींकडे एकत्रित तसेच स्वतंत्रपणे तपास करायचा आहे. त्यामुळे आरोपीची पोलीस कोठडी आवश्यक आहे. याबाबत पोलीस उपायुक्त भाग्यश्री नवटके म्हणाल्या की, आरोपींकडे ज्या बँकेच्या खात्यांची माहिती मिळाली आहे, त्या बँकांकडे आम्ही चौकशी करीत आहोत. यातील आणखी काही संशयित आरोपी असून त्यांच्या शोधासाठी परराज्यात पथके रवाना झाली आहेत.