Pune : बिबवेवाडीमधील खुन प्रकरणातील 6 आरोपींना जन्मठेपेची शिक्षा

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – खून प्रकरणातील सहा आरोपींना अतिरिक्त जिल्हा व सत्र न्यायालयाने आज जन्मठेपेची शिक्षा सुनावली. अतिरिक्त जिल्हा व सत्र न्यायाधीश एस.एच. ग्वालानी यांच्या कोर्टाने आरोपींना दोषी ठरवत जन्मठेप आणि प्रत्येकी 5 हजार रुपये दंड व दंड न भरल्यास 3 महिने सक्तमजुरीची शिक्षा सुनावली.

बापु शिवाजी कांबळे (वय. 46), सुरज नारायण माने (वय. 25), विजय सुरेश गुंड (वय. 25), दिलीप गजेंद्र सोनवने (वय. 44), संतोष दामु सुतार (वय. 33 वर्ष सर्व रा. अप्पर ओटा, इंदिरानगर, बिबवेवाडी, पुणे), अमित हिरामण धोत्रे (वय. 27 रा. पर्वती पायथा, दांडेकर ब्रीज, पुणे) अशी जन्मठेपेची शिक्षा झालेल्या आरोपींची नावे आहेत.

आरोपींविरुद्ध गुन्हा सिद्ध करण्यासाठी अतिरिक्त सरकारी वकील विलास आण्णासाहेब घोगरे पाटील यांनी 13 साक्षीदार तपासले. त्यासाठी त्यांना बिबवेवाडी पोलीस स्टेशनचे सजंय पुणेकर यांनी मदत केली. आरोपीच्या म्हणण्यानुसार घटना घडली त्यावेळी ते घटनास्थळावर हजर नव्हते व यातील फिर्यादी संदीप श्रीमंत सकट याने पोलिसांच्या मदतीने त्यांना खोट्या केसमध्ये गुंतविले आहे, असे सांगितले.

सरकार पक्षातर्फे, सरकारी वकिल विलास घोगरे पाटील यांनी आरोपीचे व यातील फिर्यादी यांचे घटनेपुर्वी पूर्ववैमनस्य नव्हते तसेच या केसमधील फिर्यादी, वैद्यकीय अधिकारी, तपासी अंमलदार व घटनेनंतर आरोपीच्या कपड्यावर मयताच्या रक्ताचे डाग इत्यादी पुरावा, आरोपींविरुद्ध गुन्हा सिद्ध होण्यास पुरेसा आहे, असा युक्तिवाद केला. सरकारी वकिलांचा युक्तिवाद ग्राह्य धरून न्यायाधीश एस. एच. ग्वालानी यांनी आरोपींना जन्मठेपेची शिक्षा सुनावली. तपासी अंमलदार एम. बी. खंडाळे, पोलीस निरीक्षक यांनी आरोपींविरुद्ध दोषारोप पत्र न्यायालयात दाखल केले होते.